कोलकाता : प. बंगालच्या साऊथ २४ परगणा जिल्ह्यात शुक्रवारी जमावाने ईडी व सीआरपीएफच्या पथकावर जीवघेणा हल्ला केला. २०० जणांच्या जमावाने या तपास यंत्रणेच्या दोन वाहनांची तोडफोड केली. यात काही अधिकाऱ्यांच्या डोक्यावर मार लागला असून त्यांना रुग्णालयात नेले आहे.
‘ईडी’च्या पथकाने शुक्रवारी रेशन घोटाळ्याप्रकरणी १५ ठिकाणी छापेमारी केली. हे पथक साऊथ २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखली गावात तृणमूलचे नेते शेख शाहजहा आणि बोंगांव नगरपालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आध्या यांच्या घरावर छापेमारी करायला पोहचली, तेव्हा तृणमूल समर्थकांनी त्यांना घेरून त्यांच्यावर हल्ला केला. शेख शाहजहा हे उत्तर २४ परगणा जिल्हा परिषदेचे मत्स्य व पशु संसाधन अधिकारी आहेत. तसेच संदेशखली येथील ब्लॉक अध्यक्षही आहे. ते राज्याचे वन मंत्री ज्योतिप्रिय मल्लिक यांचे निकटवर्तीय आहे. मल्लिक हे सध्या रेशन घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांच्या पथकावर हल्ला झाला तेव्हा शाहजहा यांच्या घराचे टाळे तोडले जात होते. पथकाने शाहजहा यांना अनेकवेळा फोन करून येण्यास सांगितले होते. मात्र, ते आले नाहीत. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही त्यांनी बोलणे केले नाही.
राज्यपालांनी गृह सचिव व डीजीपींना बोलावले
प. बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी घटनेची माहिती मिळताच राज्याच्या गृह सचिव व पोलीस महासंचालकांना तातडीने बोलावले. ही घटना चिंताजनक व निषेधार्ह आहे. लोकशाहीतील हिंसा रोखणे हे सभ्य सरकारचे कर्तव्य आहे. कोणतेही सरकार आपले कर्तव्य निभावण्यात अपयशी ठरल्यास भारताची राज्यघटना आपले काम करेल, असे ते म्हणाले.
एनआयएकडून तपास करावा : भाजपची मागणी
पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी ईडीच्या पथकावरील हल्ल्याचा निषेध केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्था डळमळीत झाली आहे. रोहिंग्या हे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत काय करत आहेत हे यातून दिसून येते. मी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या घटनेची एनआयएमार्फत चौकशी मागणी केली आहे, असे अधिकारी म्हणाले.
घटनेचा निषेध -केंद्रीय मंत्री प्रामाणिक
संदेशखली गावात जे घडले त्याचा मी निषेध करत आहे. केंद्रीय तपास पथकावर हल्ला होणे ही बाब अतिशय चिंताजनक आहे. हा हल्ला केवळ ईडीवर नाही तर राज्यघटना, संघराज्य पद्धतीवर आहे. प. बंगालमध्ये अशा घटना सतत होत आहेत.
उद्या हत्याही होतील -काँग्रेस
‘ईडी’वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले की, ईडी अधिकाऱ्यांवर सत्तारूढ सरकारच्या गुंडांनी केलेला हल्ला पाहता राज्यात कोणतीही कायदा-सुव्यवस्था नाही. आज ते अधिकारी जखमी झाले उद्या त्यांची हत्या केली जाऊ शकते. असे घडल्यास माझ्यासाठी आश्चर्य वाटणार नाही, असे ते म्हणाले.