चेन्नर्इ : उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्म मुळापासून नष्ट करायला पाहिजे, असे म्हटल्यानंतर समाजात सर्वदूरपर्यंत उडालेला संतापाचा धुरळा खाली बसायच्या आधीच याच डीएमके पक्षाचे अन्य नेते ए. राजा यांनी सनातन धर्म हा समाजाला जडलेला एचआयव्ही आणि महारोगासारखा भयानक रोग आहे, असे विधान करून या संतापाच्या आगीत आणखी तेल ओतले आहे.
चेन्नर्इ येथे बुधवारी द्रविडर कझागमद्वारा आयोजित विश्वकर्मा योजनेचा निषेध करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत राजा म्हणाले की, सनातन धर्माविषयी बोलताना उदयनिधी यांनी फारच सौम्य शब्दांचा वापर केला आहे. त्यांनी केवळ मलेरिया, डेंग्यू, कोरोनाप्रमाणे या धर्माला नष्ट केले पाहिजे, असे म्हटले आहे. मलेरिया आणि डेंग्यू हे समाजाला लागलेला काळिमा नाहीत, पण सनातन धर्म मात्र आहे. असे विखारी शब्द ए. राजा यांनी सनातन धर्माविषयी काढले आहेत.
उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून सुरू झालेली राजकीय झटापट गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. डीएमके पक्ष इंडिया आघाडीत सामील असल्यामुळे भाजप नेत्यांनी उदयनिधीच्या वक्तव्यावरून इंडिया आघाडीला लक्ष्य करून ही आघाडी हिंदू धर्माविरोधात आहे, असा आरोप केला आहे. उदयनिधीच्या वरताण ए. राजा यांनी सनातन धर्माविषयी शब्दप्रयोग केले आहेत. ते म्हणतात की, मलेरिया आणि डेंग्यू याबाबत समाजासाठी किळसवाणे नाहीत अथवा काळिमा देखील नाहीत, पण अलीकडच्या काळात एचआयव्ही आणि महारोग मात्र समाजासाठी किळसवाणे रोग आहेत. तेव्हा आपण सनातन धर्माकडे समाजाला लागलेल्या किळसवाण्या व काळिमा लावणाऱ्या रोगांप्रमाणे पाहिले पाहिजे.
ए. राजा यांनी पंतप्रधानांना देखील आव्हान देत सांगितले की, ते खरे सनातनी नाहीत. तसे असते तर ते परदेशात गेलेच नसते. कारण सनातन धर्मात समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले जाते. तसेच मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना राजा यांनी जाहीर आव्हान देताना सनातन धर्मावर चर्चा करण्यास समोरासमोर या, असे सांगितले. तुमच्याकडे धनुष्य, बाण, कोयता जी काही शस्त्रे आहेत तेवढी घेऊनच या, मी मात्र आंबेडकर आणि पेरियार यांनी लिहिलेली पुस्तके घेऊन येर्इन, असेही त्यांनी सांगितले. तसेच आपण हे सर्व पक्षप्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्या परवानगीने करीत आहोत, असेही राजा यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सनातन धर्मावर हल्ला करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, असे आपल्या मंत्र्यांना बुधवारी सांगितले आहे. यामुळे ए. राजांच्या या वक्तव्याला आता भाजपकडून जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे.