
नवी दिल्ली : यंदा अल-निनोचा प्रभाव राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. तो दूर सारत यंदा मान्सूनने जुलैमध्ये तुफान फटकेबाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये पाऊस १३ टक्के जादा बरसला आहे, तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा म्हणाले की, मध्य भारत, पूर्व भारताचा काही भाग, ईशान्य भारतात व हिमालयाच्या जवळील काही उपविभागात पाऊस सामान्यापेक्षा जास्त झाला आहे, तर ईशान्य भारताच्या काही भागात मान्सून कमी झाला.
भारतात जुलैमध्ये १३ टक्के अधिक पाऊस झाला, तर पूर्व व ईशान्य भागात १९०१ नंतर तिसऱ्यांदा कमी पाऊस झाला आहे.
वायव्य भारतात २५८.६ मिमी पाऊस झाला आहे. जुलै २००१ पासून हे प्रमाण सर्वाधिक आहे. जूनमध्ये भारतात पावसाची तूट ९ टक्के होती, तर जुलैमध्ये तो १३ टक्के अधिक पडला.
देशात आतापर्यंत ४६७ मिमी पाऊस झाला आहे. ४४५.८ मिमी पाऊस झाल्यास तो सामान्य पाऊस समजला जातो. दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या ‘अल-निनो’चा प्रभाव अद्यापि पावसावर झालेला नाही, असे मोहपात्रा म्हणाले.