उत्तरकाशीत हिमस्खलन, १० गिर्यारोहकांचा मृत्यू, १८ जण अद्यापही बेपत्ता

बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराचे बचावकार्य सुरू
उत्तरकाशीत हिमस्खलन, १० गिर्यारोहकांचा मृत्यू, १८ जण अद्यापही बेपत्ता
ANI

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे झालेल्या हिमस्खलनात १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला असून १८ जण अद्याप बेपत्ता आहेत. अचानक झालेल्या हिमस्खलनामुळे द्रौपदीच्या डांडा-२ पर्वत शिखरावर एकूण २८ गिर्यारोहक अडकले होते. त्यापैकी १० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप १८ जण बेपत्ता आहेत. बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि लष्कराचे बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी भारतीय हवाई दलाने २ चित्ता हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

५ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर झाला अपघात

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, द्रौपदीचा डांडा ५,००६ मीटर उंचीवर आहे. पीटीआयनुसार, उत्तरकाशी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवेंद्र पटवाल यांनी सांगितले की, हिमस्खलनात अडकलेल्यांमध्ये नेहरु इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग (NIM) चे प्रशिक्षणार्थी गिर्यारोहक आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा समावेश आहे.

गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांनी अपघाताची माहिती घेतली

सीएम पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत ट्विट केले आहे, द्रौपदीच्या दांडा-२ पर्वत शिखरावर हिमस्खलनात अडकलेल्या प्रशिक्षणार्थींना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ, एसडीआरएफ, आर्मी आणि आयटीबीपीचे जवान एनआयएमच्या टीमसह मदत आणि बचाव कार्य करत आहेत. नेहरू पर्वतारोहण संस्थेचे २८ प्रशिक्षणार्थी हिमस्खलनात अडकल्याची माहिती आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी बोलून बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची विनंती केली, त्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. सर्वांना वाचवण्यासाठी बचाव मोहीम राबवली जात आहे.

तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून उत्तरकाशीमध्ये हिमस्खलनाची घटना अत्यंत दुःखद असल्याचं म्हटलं. यासंदर्भात मी अधिकाऱ्यांशी बोललो आहे. स्थानिक प्रशासन, SDRF, NDRF, ITBP आणि लष्कराचे पथक पूर्ण तयारीनिशी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

बर्फवृष्टीमुळे बचाव कार्यात अडथळे

गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन राबवण्यात येत आहेत. मात्र, त्याच दरम्यान बर्फवृष्टी सुरु झाली, त्यामुळे बचाव कार्याचा वेग मंदावला आहे.

तीन दिवसांपूर्वी केदारनाथजवळ ग्लेशियर घसरलं

उत्तराखंडमधील केदारनाथजवळ १ ऑक्टोबर रोजी ग्लेशियर घसरल्याची घटना घडली होती. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी सांगितले की, पहाटे हिमालयीन भागात हिमस्खलन झाले, मात्र केदारनाथ मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. बर्फाचा डोंगर घसरतानाचा व्हिडिओही समोर आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in