देशात यंदा सरासरी इतका पाऊस; मान्सूनबाबत हवामान खात्याचा पहिला अंदाज जाहीर

यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) सोमवारी जाहीर करण्यात आला.
देशात यंदा सरासरी इतका पाऊस; मान्सूनबाबत हवामान खात्याचा पहिला अंदाज जाहीर
Published on

नवी दिल्ली : यावर्षी मान्सूनवर अल निनोचा प्रभाव पडणार नाही. त्यामुळे देशात यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा मान्सूनबाबतचा पहिला अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (आयएमडी) सोमवारी जाहीर करण्यात आला.

भारतीय हवामान विभागाकडून सोमवारी एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना ‘आयएमडी’चे संचालक एम. महापात्रा यांनी सांगितले की, अल निनोचा प्रभाव कमी असल्यामुळे यंदा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत सविस्तर अंदाज नंतर जाहीर करण्यात येईल.

यापूर्वी, २०२३ मध्ये अल निनोचा मोठा प्रभाव मान्सूनवर पडल्याने मान्सूनच्या पावसाच्या प्रमाणात सरासरी ८ टक्के घट झाली होती. तर गेल्या वर्षी ना निनाच्या प्रभावामुळे ८ टक्के अतिरिक्त मान्सूनचा पाऊस पडला. २०२३ मध्ये अल निनोमुळे कोरडादुष्काळ पडला होता, तर २०२४ मध्ये ना निनामुळे ओला दुष्काळ होता. मात्र, यंदा सरासरी इतकाच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अल निनोच्या प्रभावावर मान्सूनचा अंदाज बांधता येतो. अल निनोची निर्मिती ही प्रशांत महासागराचे तापमान वाढल्यामुळे होते. अल निनोचा परिणाम हा भारतातील मान्सून काळात पडणाऱ्या पावसावर होत असतो. अल निनो वाढत्या प्रभावामुळे भारतातील पर्जन्यमानामध्ये सरासरीच्या तुलनेत घट होते.

देशभरात उष्णतेची लाट

यावर्षी मान्सून सामान्य होण्याचा अंदाज आहे. मात्र, त्यापूर्वी एप्रिल ते जून या कालावधीमध्ये देशभरात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसू शकतो. तापमान सरासरी पेक्षा अधिक असणार आहे. देशातील काही भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या देखील वर जाऊ शकते. हे तापमान सरासरी तापमानाच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने अधिक आहे. पूर्व, उत्तर भारतामध्ये प्रचंड उष्णता पाहायला मिळू शकते, तर महाराष्ट्रात देखील पुढील दोन महिने प्रचंड उकाडा जाणवणार आहे, असे महापात्रा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in