अयोध्येत २२ जानेवारीला ‘रामलल्ला’ होणार विराजमान

श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरला : दर्शन आणि पूजाही सुरू होणार
अयोध्येत २२ जानेवारीला ‘रामलल्ला’ होणार विराजमान
Published on

तमाम देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ या दिवशी ‘रामलल्ला’ विराजमान होणार असून, मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. तसेच जानेवारी २०२४ मध्येच मंदिरात दर्शन-पूजेला सुरुवात होईल. उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिराचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, गर्भगृहाचे खांब १४ फुटांपर्यंत पूर्ण झाले आहेत.

श्रीराम मंदिराचे बांधकाम तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण होईल. दुसरा टप्पा डिसेंबर २०२४ मध्ये, तर २०२५ पर्यंत मंदिराचे संपूर्ण काम पूर्णत्वास जाईल. मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अंदाजे १८०० कोटी रुपये मंदिर पूर्ण होण्यासाठी खर्च होणार आहेत.

सध्या राम मंदिराच्या गर्भगृहाच्या बांधकामाचे काम जोरात सुरू आहे, त्यानंतर आता गर्भगृहाचा आकारही दिसू लागला आहे. गर्भगृहासाठी बनवलेल्या खांबांचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, आता छताच्या मोल्डिंगचे काम सुरू झाले आहे. श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गर्भगृह पूर्ण करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे, तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराचा पहिला मजला तयार होईल. पहिल्या मजल्यावर राम दरबार असेल, तर दुसरा मजला रिकामा राहील.

रामलल्लाच्या मूर्तीसाठी अनेक ठिकाणांहून दगड आणण्यात आले आहेत. यामध्ये नेपाळच्या गंडक नदीतून आणलेल्या शालिग्राम दगडाचा समावेश आहे. मंदिरात अभिषेक करण्यात येणारी मूर्ती ही रामाची बालपणातील असेल. ही मूर्ती प्राचीन ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे बनवण्यात येणार आहे.

मुंबईतील चित्रकाराच्या चित्राच्या आधारे साकारणार मूर्ती

‘संत, भूगर्भशास्त्रज्ञ, शिल्पकार, हिंदू धर्मग्रंथातील तज्ज्ञ आणि ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर ‘कृष्णशिला’ची निवड करण्यात आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांच्या चित्रावर देशातील ५ चित्र शिल्पकारांच्या समितीचे एकमत झाले आहे. या चित्राच्या आधारे मूर्तीला आकार दिला जाणार आहे’, असे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in