जय श्री राम! विराजमान झाले रामलल्ला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न; बघा कसे आहे राम मंदिर

अखेर तो क्षण आला...जय श्रीरामचा जयघोष, शंखनाद, ५० हून अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात आज (दि.22) दुपारी 12.29 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले.
जय श्री राम! विराजमान झाले रामलल्ला, पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा संपन्न; बघा कसे आहे राम मंदिर

अखेर तो क्षण आला...जय श्रीरामचा जयघोष, शंखनाद, ५० हून अधिक वाद्यांच्या मंगलमय आवाजात आज (दि.22) दुपारी 12.29 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विधीवत पूजा अर्चा करून श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला.

असे आहे राम मंदिर -

अयोध्येतील शरयू नदीच्या काठी उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरातील मुख्य मंदिर २५० फूट रुंद, ३८० फूट लांब आणि १६१ फूट उंच आहे. मंदिराची मुख्य रचना तीन मजली उंच व्यासपीठावर केली आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी आणि प्रवेशद्वारावर पाच मंडप आहेत. एका बाजूला कुडू, नृत्य आणि रंगासाठी तीन मंडप असतील तर दुसऱ्या बाजूला कीर्तन आणि प्रार्थनेसाठी दोन मंडप असतील. मंदिराच्या इमारतीत एकूण ३६६ स्तंभ आहेत. प्रत्येक खांबावर भगवान शिवाचे अवतार, विष्णूचे दशावतार, ६४ योगिनी आणि देवी सरस्वतीच्या १२ अवतारांसह १६ मूर्ती स्थापित केल्या आहेत. पायऱ्यांची रुंदी १६ फूट आहे. विष्णूला समर्पित मंदिरांच्या रचनेनुसार गर्भगृह अष्टकोनी आहे. संपूर्ण मंदिराची उभारणी १० एकर जागेवर केली आहे, तर एकूण परिसर ५७ एकरचा आहे. ज्यात प्रार्थनागृह, व्याख्यान हॉल, शैक्षणिक सुविधा, भोजनालय आणि इतर सुविधांसह संग्रहालयाही उभारण्यात येत आहे. मंदिर समितीच्या दाव्यानुसार ७० हजारहून अधिक लोक येथे भेट देऊ शकतील. लार्सन अँड टुब्रोने मंदिराचे डिझाईन आणि बांधकामाची संपूर्ण जबाबदारी नि:शुल्क उचलली आहे. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट आणि आयआयटी मुंबई, गुवाहाटी आणि मद्रास यांनी माती परीक्षण, काँक्रीट आणि डिझाइन यासारख्या कामांसाठी मदत केली आहे. राजस्थानातील बन्सी येथून आणलेल्या दगडाचा बांधकामासाठी वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या बांधकामात लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. दगड जोडण्यासाठी तांब्याचा वापर करण्यात आला आहे.

रामलल्लाशिवाय असतील सहा देवतांची मंदिरे

अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मुख्य मंदिरासह सूर्य, गणेश, महादेव, दुर्गा, विष्णू आणि ब्रह्मा यांची सहा स्वतंत्र मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाच्या बालरूपातील दोन मूर्ती ठेवल्या जात आहेत. त्यातील मुख्य मूर्ती श्रीरामाच्या ५ वर्षे वयाच्या रूपातील आहे. २९ डिसेंबर २०२३ ला मतदान प्रक्रियेद्वारे अयोध्या राम मंदिरासाठी रामलल्लाच्या मूर्तीची निवड करण्यात आली आहे. कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी रामाची मूर्ती तयार केली आहे. रामलल्लाचा पोशाख भागवत प्रसाद आणि शंकर लाल यांनी शिवला आहे. हे दोघे राम मूर्तीचे चौथ्या पिढीतील शिंपी आहेत.

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा

राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्यापासून तेथे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. देशाच्या विविध प्रमुख शहरांतून विभानसेवा सुरू केली जाणार आहे. याशिवाय नवीन रेल्वे स्थानक, नवीन बस स्थानक उभारण्यात आले आहे. रस्ते मार्गाने अयोध्येत येण्यासाठी सर्व दिशांनी चौपदरी महामार्गांची बांधणी करण्यात आली आहे. अयोध्येत प्रदूषणमुक्त वातावरण रहावे, यासाठी सरकारने शेकडो इलेक्ट्रिक बस, रिक्षा अशी वाहने तैनात केली आहेत.

कोण आहेत राम मंदिराचे वास्तुरचनाकार?

राम मंदिराची मूळ रचना अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने १९८८ मध्येच तयार केली आहे. मंदिराची स्थापत्य रचना उत्तर भारतात हिंदू मंदिरांत आढळणाऱ्या नागर शैलीतील आहे. सोमपुरा कुटुंबाच्या १५ किमान १५ पिढ्यांनी गुजरातमधील सोमनाथ मंदिरासह जगभरातील १०० हून अधिक मंदिरांच्या डिझाइनमध्ये योगदान दिले आहे. राम मंदिराची रचना मुख्य वास्तुविशारद चंद्रकांत सोमपुरा यांच्यासह त्यांची दोन मुले निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा यांनी केली आहे. हिंदू ग्रंथ, वास्तुशास्त्र आणि शिल्प शास्त्रानुसार मंदिराची रचना करण्यात आली आहे. हे मंदिर जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in