

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाच्या पूर्णत्वाचे प्रतीक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवला. राम मंदिरावर फडकवण्यात आलेला धर्मध्वज हे भारताच्या सभ्यतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. भारताला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढणे आवश्यक आहे. पुढील १० वर्षांत आपण भारतीय जनतेला गुलामगिरीच्या मानिसकतेतून बाहेर काढले, तर २०४७ पर्यंत भारत विकसित झालेला दिसेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ‘शतकानुशतके झालेले घाव आता भरत आहेत, वेदनेला आता पूर्णविराम मिळतो आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती आहे, ज्याचा अग्नि ५०० वर्षे प्रज्ज्वलित होता, असे भावुक उद्गार मोदींनी यावेळी काढले.
या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरससंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती. या ध्वजारोहणासाठी खास मुहूर्त निवडण्यात आला होता. मंगळवारी सकाळी ११.४५ ते १२.२९ वाजेपर्यंत अभिजीत मुहुर्तावर ध्वजारोहण करण्यात आले. याच अभिजीत मुहुर्तावर भगवान श्रीरामाचा जन्म झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ध्वजारोहणासाठी हा मुहूर्त निवडण्यात आला.
देशात परिवर्तन घडत आहे!
देशात आता परिवर्तन घडू लागले आहे. गुलामीची मानसिकता, जिने आमच्या रामत्वाला नाकारले ती आता बाजूला होते आहे. भगवान श्रीराम ही एक मूल्यप्रणाली आहे. भारताच्या प्रत्येक घरात, प्रत्येक भारतीयाच्या मनात आणि कणाकणात राम आहे. पूर्वी गुलामीच्या मानसिकतेने आपल्याला वेढले होते, त्यामुळेच आपल्यापैकी काही जण प्रभू श्रीरामाला काल्पनिक घोषित करून मोकळे झाले होते.
...तर २०४७ पर्यंत विकसित देश
पंतप्रधान म्हणाले, आपण आत्ता ठरवले तर पुढच्या १० वर्षांमध्ये मानसिक गुलामीपासून मुक्ती मिळवू शकतो. तसे झाल्यास असा अग्नी प्रज्वलित होईल, भारतीयांचा आत्मविश्वास इतका वाढेल की २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल. आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. केवळ १० वर्षांमध्ये आपल्याला गुलामीच्या बेड्या तोडाव्या लागतील.
कोविदार वृक्षाचे महत्त्व
ध्वजावरील कोविदार वृक्षाचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. पौराणिक मान्यतांनुसार हा पारिजात व मंदार या वृक्षांच्या दिव्य संयोगातून बनलेला दिव्य वृक्ष आहे. आजच्या काळातील कचनार वृक्ष हा कोविदार वृक्षासारखा दिसतो. सूर्यवंशी राजांच्या ध्वजावर या वृक्षाची प्रतिमा असायची. महर्षी वाल्मीकी यांनी लिहिलेल्या रामायणानुसार भरत राजाच्या ध्वजावर कोविदार वृक्षाची प्रतिमा होती.
जग राममय
ध्वजारोहणानंतर मोदी म्हणाले, आज या ध्वजारोहणानंतर आपला अनेक वर्षांचा यज्ञ पूर्ण झाल्याची भावना उफाळून आली आहे. आज सगळे जग राममय झाले आहे. भगवान श्री रामांचा हा धर्मध्वज, एक साधारण ध्वज नाही. हा भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. या ध्वजातला भगवा रंग, यामधील सूर्यवंशाची ख्याती, ओम शब्द, यावर रेखाटलेला कोविदार वृक्ष या सगळ्यातून राम राज्याची कीर्ती प्रतिरुपित होत आहे. हा ध्वज संकल्प व यशाचा आहे. ही संघर्षातून सृजनाची गाथा आहे. ही संतांची साधना आहे.
अयोध्या सांस्कृतिक चेतनेचे प्रतीक
आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेचे प्रतीक झाली आहे. भारतासह संपूर्ण विश्व आज राममय झाले आहे. प्रत्येक राम भक्ताच्या हृदयात अद्वितीय संतोष आहे आणि असीम कृतज्ञता तसेच अपार आनंद आहे. शतकानुशतके झालेले घाव आता भरत आहेत, वेदनेला आता पूर्णविराम मिळतो आहे. आज त्या यज्ञाची पूर्णाहुती आहे ज्याचा अग्नि ५०० वर्ष प्रज्ज्वलित होता, असे पंतप्रधान म्हणाले.
संस्कृती आणि सभ्यतेचे प्रतीक
आज स्थापन झालेला हा धर्मध्वज केवळ एक ध्वज नाही तर भारतीय सभ्यतेच्या पुनर्जागरणाचा ध्वज आहे. या झेंड्याचा भगवा रंग, त्यावर असलेला सूर्य, कोविदार वृक्ष हे सगळे रामराज्याची कीर्ती दाखवणारे आहे. हा ध्वज संकल्प आहे, हा ध्वज यश आहे. संघर्षापासून सृजनाची गाथा म्हणजे हा ध्वज आहे. शतकांपासून चालत आलेल्या स्वप्नाचे साकार स्वरुप म्हणजे हा ध्वज आहे. येत्या शतकांमध्ये आणि हजार वर्षांपर्यंत हा धर्मध्वज प्रभू रामाचे आदर्श आणि सिद्धांत यांचा जयजयकार करत राहील. हा धर्मध्वज आवाहन करत असेल की, सत्यमेव जयते. हा धर्म ध्वज सांगतो आहे सत्यम एकपदम् ब्रह्म सत्यः धर्मः म्हणजेच सत्यच ब्रह्माचे स्वरुप आहे हे हा ध्वज सांगतो आहे. हा धर्म ध्वज जगाची प्रेरणा होईल, असेही मोदी म्हणाले.
असा आहे धर्मध्वज
भगव्या रंगाचा २२ फूट लांब व ११ फूट रुंद असा ध्वज आता मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर फडकताना दिसतोय. या ध्वजाचा दंड ४२ फूट इतका उंच आहे. या ध्वजावर तीन चिन्ह आहेत. यामध्ये सूर्य, ॐ आणि कोविदार वृक्षाचा समावेश आहे. सनातन परंपरांमध्ये भगवा रंग हा त्याग, बलिदान, वीरता व भक्तीचे प्रतीक मानला जातो.