

अयोध्या : जगप्रसिद्ध अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील पैशांच्या कथित अपहार प्रकरणी तपास यंत्रणांनी रुदौली भागातील मीनापूर ठकुरन फगौली गावात शनिवारी छापा टाकला. त्यावेळी आरोपी लवकुश मिश्रा याच्या घरातून सुमारे १० लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. ही कारवाई राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली.
राम मंदिरात कर्मचारी असलेला लवकुश मिश्रा दानपेटीत अर्पण केलेल्या पैशांच्या अपहारात सामील असल्याचा आरोप आहे. छाप्यादरम्यान जप्त केलेली रोकड तपास पथकाने आपल्या ताब्यात घेतली आहे.
मंदिर ट्रस्टने शनिवारी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे या चोरीच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी 'एसआयटी' नेमण्याची मागणी केली. लवकुशचे वडील बच्चूलाल मिश्रा यांनी सांगितले की, राम मंदिर ट्रस्टशी संबंधित तीन-चार लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांनी कुलूप उघडून रोकड सोबत नेली. त्यांना या पैशांबद्दल कोणतीही माहिती नव्हती, कारण ते बऱ्याच काळापासून गाझियाबादमध्ये राहत होते.
माझा मुलगा गेल्या पाच-सहा महिन्यांपासून राम मंदिरात काम करत होता. त्याला तिथे आमचे व्याही रवी मिश्रा यांनी नोकरी लावून दिली होती. फैजाबादमध्ये बांधले जाणारे घर हे आमचे कष्ट आणि जमीन गहाण ठेवून जमा केलेल्या पैशांतून बांधले जात आहे, त्याचा मुलाशी काहीही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकुश आधी कार मेकॅनिकचे काम करायचा. लग्नानंतर साधारण एका वर्षापूर्वी त्याला मंदिर ट्रस्टमध्ये नोकरी मिळाली होती. नोकरी मिळाल्यानंतर त्याच्या आर्थिक परिस्थितीत अचानक बदल दिसून येऊ लागला होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, गावात आल्यावर तो सढळ हाताने खर्च करायचा. एका गावकऱ्याने दावा केला की, एकदा त्याने दारूच्या दुकानावर सुमारे ५० हजार रुपये खर्च केले होते. मात्र, या दाव्यांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लवकुशने कथितपणे काही रोकड गावातील एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात लपवली होती, अशीही चर्चा गावात सुरू आहे.