रामनवमीला रामलल्लावर होणार सूर्यकिरणांचा अभिषेक, अयोध्येतील मंदिराची विशेष रचना

१२ प्रवेशद्वार, ५५ ते ७० हजार चौरस फुटाचा एक दगड अशा शेकडो दगडात कोरीव काम, सहा हजार कामगारांच्या रात्रंदिवस मेहनतीने ७० एकर जमिनीवर हनुमानगढीच्या एक किलोमीटर अंतरावर रामलल्लाचे भव्यदिव्य अयोध्या नगरीत साकारले जात आहे.
रामनवमीला रामलल्लावर होणार सूर्यकिरणांचा अभिषेक, अयोध्येतील मंदिराची विशेष रचना

गिरीश चित्रे/ अयोध्यानगरी :

१२ प्रवेशद्वार, ५५ ते ७० हजार चौरस फुटाचा एक दगड अशा शेकडो दगडात कोरीव काम, सहा हजार कामगारांच्या रात्रंदिवस मेहनतीने ७० एकर जमिनीवर हनुमानगढीच्या एक किलोमीटर अंतरावर रामलल्लाचे भव्यदिव्य अयोध्या नगरीत साकारले जात आहे. राम मंदिराची विशेषतः म्हणजे वर्षातून एकदा येणाऱ्या रामनवमीला रामलल्लाच्या मूर्तीवर थेट सूर्यकिरणं पडतील, असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, २२ जानेवारीला राम मंदिरांचे उद्घाटन होणार असून अयोध्या ते बायपास नाक्याजवळील एअरपोर्ट थेट विमानसेवेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात येत आहे. अयोध्या तसे एक लहानसे शहर. परंतु अयोध्येत भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात येत असल्याने अयोध्या नगरीचा चेहरामोहरा बदलत आहे. अयोध्येत देवी-देवतांची अनेक प्राचीन मंदिरं आहेत. परंतु रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात असल्याने अयोध्येत नवउत्साह पहावयास मिळत आहे. रामलल्लाच्या भक्तांचा आनंद शिगेला पोहोचला असून स्थानिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ७० एकर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचे उद‌्घाटन २२ जानेवारी रोजी होणार आहे. अयोध्येतील भव्यदिव्य राम मंदिर परिसरात येणाऱ्या भक्तांना विश्रांतीसाठी विश्रामगृह उभारण्याचे काम वेगाने सुरू असून २२ जानेवारीपूर्वी हे काम पूर्ण होईल, असा विश्वास एल अँड टीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

रस्ते चकाचक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद‌्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत येणार असल्याने अयोध्या परिसरातील रस्ते चकाचक करण्यात आले असून दोन हजारांहून अधिक सफाई कामगार सफाई मोहिमेत सहभागी असल्याचे कामगारांनी सांगितले.

राम जय राम घोषणांनी अयोध्या दुमदुमतेय!

अयोध्येत रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात असून २२ जानेवारीला उद‌्घाटन होणार आहे. पुढील काही दिवसांत भव्यदिव्य मंदिराचे उद‌्घाटन होणार असले तरी संपूर्ण अयोध्या राममय झाली असून राम श्री राम जय जय राम घोषणांनी अयोध्या दुमदुमतेय!

रामलल्लाची मूर्ती आर्मीच्या प्रोटेक्शनमध्ये

भव्यदिव्य मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणारी रामलल्लाची मूर्ती सध्या आर्मीच्या प्रोटेक्शन भव्यदिव्य मंदिरात ठेवण्यात आली आहे.

पर्यटनाला चालना

रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येत बांधण्यात आले याचा संपूर्ण देशवासीयांना अभिमान आहे. कापडी पर्स, पिशव्या, चादरी, बॅग अशा वस्तू वर्षानुवर्षे आम्ही विक्री करतो. याठिकाणी मेळा किंवा कार्यक्रम असल्यास हजारोंच्या संख्येने भक्त अयोध्येत दाखल होतात. आता तर रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात असल्याने पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक दुकानदारांना रोजगार मिळेल आणि उदरनिर्वाहाची चिंता मिटेल.

राम मूर्ती तात्पुरत्या दर्शनासाठी

रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत येणाऱ्या भक्तांसाठी रामाची मूर्ती भव्यदिव्य मंदिराशेजारी ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारीला भव्यदिव्य राम मंदिराचे उद‌्घाटन होणार असल्याने तात्पुरते मूर्तीचे दर्शन भाविकांसाठी २० जानेवारीपासून बंद होणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आढावा

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बायपास नाक्याजवळील एअरपोर्ट, वंदे भारतसह आठ ट्रेन, नव्याने बांधण्यात आलेल्या अयोध्या स्टेशनचे उद‌्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे. उद‌्घाटनाच्या आधी शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी अयोध्येत सुरू असलेल्या विविध कामांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आढावा घेतला.

वंदे भारत ट्रेन, दोन अमृत भारतसह आठ ट्रेनचा आज शुभारंभ!

राज्यातील सातव्या आणि मुंबईला जोडणाऱ्या पाचव्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे शनिवार, ३० डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद‌्घाटन करणार आहेत. त्यानंतर १ जानेवारी २०२४ पासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. दरम्यान, या गाडीसह अयोध्येत आणखी पाच वंदे भारत आणि दोन अमृत भारत यासह एकूण आठ एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

१२ हजार सीआरपीएफचे जवान, पोलिसांचा फौजफाटा!

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एअरपोर्ट, अयोध्या रेल्वे स्टेशन व वंदे भारतसह आठ ट्रेनचे उद‌्घाटन होणार आहे. त्यामुळे या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. सीआरपीएफच्या १२ तुकड्या पाचारण केल्या असून एकूण १२ हजार सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत, तर स्थानिक पोलिसांसह शेजारील शहरातील पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in