अयोध्येतील राम मंदिराचा लोकार्पण आणि राम लल्लाच्या मूर्तीच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याला अवघे काही तास बाकी आहेत. या सोहळ्याच्या धार्मिक विधींना आठवड्याभरापासून सुरुवात झाली आहे. आज हे विधी पूर्ण होणे अपेक्षित आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच, ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
प्रभू रामाच्या मूर्तीचा अभिषेक सोहळा 22 जानेवारी रोजी दुपारी 12:20 वाजेला होणार आहे, या कार्यक्रमाला सुमारे 8,000 लोकांची उपस्थिती राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यापैकी जवळपास पंधराशे ते सोळाशे जण हे प्रमुख पाहुणे असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी होणार थेट प्रक्षेपण-
राम मंदिराचा लोकार्पण सोहळा सर्वसामान्यांना अनुभवता यावा, यासाठी या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजेपासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे प्रक्षेपण केले जाणार आहे. या दिवशी पंतप्रधानांनी देशभरातील नागरिकांना घरोघरी 'श्री राम ज्योती' प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे.
या ठिकाणी पाहता येईल सोहळा-
हा संपूर्ण सोहळ्याचे डीडी न्यूजवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तर, आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना, तसेच देशाबाहेरील भारतीयांना हा सोहळा दूरदर्शन नॅशनलच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे.
केंद्र सरकारकडून अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर-
कर्मचाऱ्यांना राम मंदिर लोकार्पण सोहळा पाहता यावा यासाठी केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने देखील 22 जानेवारी रोजी सु्ट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे, स्थापनेसाठी निवडलेली मूर्ती ही म्हैसूर येथील शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेली रामलल्लाची काळ्या दगडाची मूर्ती आहे.
'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याचे मुख्य विधी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील पुजाऱ्यांच्या पथकाद्वारे केले जाणार आहेत. तसेच, मंदिर समितीने या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक राजकारणी, कलाकार, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण पाठवले आहे.