केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना सुखद धक्का; 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, कोणाकोणाला हाफ डे?

कर्मचाऱ्यांना या सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.
केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना सुखद धक्का; 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर, कोणाकोणाला हाफ डे?

अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या गर्भगृहात रामल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्ताने जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्याला देशभरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. आता केंद्र सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. केंद्राने 22 जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे.

अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर अभिषेक सोहळ्यानिमित्त 22 जानेवारी रोजी केंद्र सरकारच्या कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आज गुरुवारी दिली. केंद्र सरकारची देशभरातील सर्व कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापनांसाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी दुपारी 2:30 वाजेपर्यंत केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कार्यालये बंद राहणार आहेत. कर्मचाऱ्यांना या सोहळ्यात सहभागी होता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने भारत आणि परदेशातील अनेक संस्थांनी विविध उपक्रमांचे नियोजन केले आहे. दूरदर्शनने संपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी विस्तृत व्यवस्था केली आहे. तसेच, अनेक खासगी टीव्ही चॅनेल्सवर देखील हा सोहळा थेट दाखवला जाणार आहे. याच बरोबर देशात आणि परदेशातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर या सोहळ्याचे थेट स्क्रिनिंग करण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in