सचिनची शेअर बाजारातही जोरदार बॅटिंग, IPO मधून एकाच दिवसात तब्बल २६.५० कोटी रुपयांचा फायदा

क्रिकेटच्या मैदानावर दमदार खेळी करणारा सचिन तेंडुलकर अर्थविश्वात देखील नवनवी शिखरं पादाक्रांत करतो आहे. आर्थिक जगतात सचिनने घेतलेली कोटीच्या कोटी उड्डाणे चर्चेत आहेत.
सचिनची शेअर बाजारातही जोरदार बॅटिंग, IPO मधून एकाच दिवसात तब्बल २६.५० कोटी रुपयांचा फायदा

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर दमदार खेळी करणारा सचिन तेंडुलकर अर्थविश्वात देखील नवनवी शिखरं पादाक्रांत करतो आहे. आर्थिक जगतात सचिनने घेतलेली कोटीच्या कोटी उड्डाणे चर्चेत आहेत. आझाद इंजिनीअरिंगचे शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात लिस्ट झाले आणि सचिन तेंडुलकरला त्यातून तब्बल ५३१ टक्के परतावा दिला. यातून त्याला २६.५० कोटी रुपयांचा फायदा मिळाला आहे.

हैदराबादस्थित आझाद इंजिनिअरिंगचे शेअर्स गुरुवारी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले. कंपनी सुमारे ३७ टक्के प्रीमियमवर सूचीबद्ध झाली आहे. विशेष बाब म्हणजे यातून सचिन तेंडुलकरला तब्बल ५३१ टक्के परतावा मिळाला आहे. आयपीएलमध्ये २४.७५ कोटी कमावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मिचेल र्स्टाकलादेखील आयपीओमध्ये २६.५० कोटी रुपयांचा नफा मिळवून मागे टाकले. यंदा ६ मार्च रोजी तेंडुलकरने ऊर्जा, एरोस्पेस आणि संरक्षण, तेल आणि वायू उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांमध्ये सुमारे ५ कोटी रुपयांची इक्विटी शेअर्सची खरेदी केली होती.

आयपीओ आधी स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूनंतर त्याच्याकडे कंपनीचे ४,३८,२१० शेअर्स होते. त्याच्या शेअर्सची सरासरी किंमत फक्त ११४.१ रुपये प्रति शेअर आहे. तेंडुलकरने ७४० कोटी रुपयांच्या आयपीओमधील आपली हिस्सेदारी न विकण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय खूपच फायदेशीर ठरला. कंपनी राष्ट्रीय शेअर बाजारात ३७.४ टक्के प्रीमियमसह ७२० रुपयांवर सूचीबद्ध झाली. तर कंपनीची इश्यू किंमत ५२४ रुपये होती. त्यांच्या ५ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता ३१.५ कोटी रुपये झाले आहे.

आयपीओने केवळ तेंडुलकरलाच श्रीमंत केले नाही, तर आणखी तीन खेळाडू म्हणजेच पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांनाही श्रीमंत केले आहे. यापैकी प्रत्येकाने कंपनीत एक कोटी रुपये गुंतवले होते, पण ज्या किमतीला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने शेअर्स खरेदी केले होते, त्यापेक्षा दुप्पट भावाने इतर खेळाडूंनी तेच शेअर्स खरेदी केले. या तिन्ही खेळाडूंच्या शेअर्सची सरासरी किंमत प्रति शेअर २२८.१७ रुपये होती. त्यामुळे तिघांनाही २१५ टक्के परतावा मिळाला.

logo
marathi.freepressjournal.in