लखनऊ : जन्माचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेशचे माजी मंत्री, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आझम खान, त्यांची पत्नी जन्जीम फातिमा आणि मुलगा अब्दुल्ला यांना बुधवारी रामपूर जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तिघांनाही सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
अब्दुल्ला आझम खान यांच्या जन्म प्रमाणपत्राशी संबंधित प्रकरणात भाजप नेते आकाश सक्सेना यांनी २०१९ मध्ये न्यायालयात खटला दाखल केला होता. विशेष सरकारी वकील अरुण कुमार यांनी न्यायालयाच्या निकालाबाबत सांगितले की, अब्दुल्ला आझम खान यांच्या जन्म प्रमाणपत्राच्या दोन खटल्यांमध्ये अब्दुल्ला आणि त्यांच्या आई-वडिलांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अब्दुल्ला आझम यांच्याकडे दोन जन्म प्रमाणपत्रे असल्याचा आरोप करण्यात आला होता. यापैकी एक जन्म प्रमाणपत्र जानेवारी २०१५ मध्ये लखनऊ नगरपालिकेने बनवलेले होते, तर दुसरे २८ जून २०१२ रोजी रामपूर नगरपालिकेने बनवले होते. ही वेगवेगळी जन्म प्रमाणपत्रे वेगवेगळ्या कामांसाठी आपल्या सोयीनुसार वापरण्यात आली असल्याचा अब्दुल्ला आझम यांच्यावर आरोप आहे.
अब्दुल्ला यांच्यावर खोट्या जन्म प्रमाणपत्राच्या आधारावर पासपोर्ट बनवून परदेश दौरे करणे आणि दुसऱ्या जन्म प्रमाणपत्राचा वापर सरकारी कामांसाठी केल्याचा आरोप आहे. दोन्ही जन्म प्रमाणपत्रे बनावट असल्याचे सिद्ध झाले आहे. भाजप नेत्याच्या तक्रारीनंतर अब्दुल्ला आझम, आझम खान, तन्जीम फातिमा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.