भाजपमधून गळती सुरूच; येदियुरप्‍पांच्या नातवाचा जेडीएसमध्ये प्रवेश

कर्नाटकचे भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हेसुद्धा दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी उत्सुक
भाजपमधून गळती सुरूच; येदियुरप्‍पांच्या नातवाचा जेडीएसमध्ये प्रवेश

कर्नाटक विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भाजपने तिकीट नाकारल्यामुळे आता बंडखोरांची संख्याही वाढत आहे. कर्नाटकचे भाजपचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हेसुद्धा दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यातच आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या नातवाने भाजपला सोडचिठ्ठी देत जनता दल सेक्युलर म्हणजे कुमारस्वामींच्या पक्षात प्रवेश केला आहे.

एन. आर. संतोष असे येदियुरप्पांच्या नातवाचे नाव असून, त्यांनी शनिवारी एच. डी. कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत जेडीएसमध्ये प्रवेश केला. येदियुरप्पा यांच्यावर कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर संतोष यांच्या रूपाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. एन. आर. संतोष यांना हासन जिल्ह्यातील अससीकेरे विधानसभा मतदारसंघातून जेडीएस रिंगणात उतरविणार असल्याची चर्चा आहे. संतोष हे येदियुरप्पा यांच्या बहीणीचे नातू आहेत. येदियुरप्पांचे निकटवर्तीय म्हणून संतोष यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्यासोबत कामही केले आहे. ते अससीकेरे येथे तीन वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय आहेत. जेडीएसकडून निवडणूक लढविण्यास ते इच्छुक होते, पण भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. संतोष यांच्या समर्थकांनी भाजपविरोधात आंदोलन केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची भेट घेत संतोष यांनी दोन तास चर्चा केली. त्यानंतर त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, कर्नाटकातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या जनता दल सेक्युलरने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करत ९३ जणांना उमेदवारी दिली आहे. जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांच्या वहिनी भवानी रेवन्ना या हासन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होत्या, पण त्यांच्याऐवजी सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत सवदींना उमेदवारी

काँग्रेसने शनिवारी तिसरी यादी जाहीर करत ४३ जणांना उमेदवारी दिली असून, त्यात भाजपमधून काँग्रेस पक्षात आलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना अथणी मतदारसंघातून, तर कोलारमधून कोथुर्जी मंजुनाथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर सवदी यांनी एक दिवसआधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तिकीट कापल्यामुळं संतापलेल्या लक्ष्मण सवदी यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते अथणीचे तीन वेळा आमदार राहिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in