'इंडिया'चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अखेर ठरला; SC चे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा

विरोधकांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. रेड्डी हे इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहेत.
'इंडिया'चा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार अखेर ठरला; SC चे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा
Published on

नवी दिल्ली: विरोधकांच्या इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. रेड्डी हे इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहेत.

निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तसेच या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियाही सुरू झाली आहे. या अधिसूचनेनुसार, २१ ऑगस्टपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येईल. तसेच २५ ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील, तर ९ सप्टेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे सत्ताधारी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत.

रेड्डी यांना पसंती मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी व इस्रोचे माजी शास्त्रज्ञ एम. अण्णादुराई यांच्या नावावर चर्चा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तुषार गांधी यांचे नाव सुचवले होते, तर द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने अण्णादुराई यांचे नाव सुचविले होते. गांधी व अण्णादुराई यांच्याबरोबर रेड्डी यांचं नाव देखील पुढे आले. त्यानंतर इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांची रेड्डी यांच्या नावावर सहमती झाली आहे.

कोण आहेत सुदर्शन रेड्डी

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. त्यांनी हैदराबाद येथे वकील म्हणून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. १९९० मध्ये केंद्राचे अतिरिक्त वकील म्हणून काही काळ काम पाहिले आहे. याबरोबरच सुदर्शन रेड्डी यांनी उस्मानिया विद्यापीठासाठी कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. १९९५ मध्ये सुदर्शन रेड्डी हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर डिसेंबर २००५ मध्ये सुदर्शन रेड्डी यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती मिळाली.

तसेच १२ जानेवारी २००७ रोजी सुदर्शन रेड्डी हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. त्यानंतर ८ जुलै २०११ रोजी निवृत्त होईपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. तसेच २०१३ मध्ये रेड्डी यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त झाले होते. मात्र, सात महिन्यांच्या कालावधीत त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता.

रेड्डी यांचे आवाहन

दरम्यान, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर सुदर्शन रेड्डी यांनी सर्व पक्षांकडे पाठिंबा मागितला आहे. रेड्डी यांनी तटस्थ असलेल्या व एनडीएतील पक्षांना आणि नेत्यांना त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. बी. सुदर्शन रेड्डी म्हणाले, मी सर्व पक्षांना मला पाठिंबा देण्याचे आवाहन करतो. मी एनडीएतील घटक पक्षांना देखील पाठिंबा देण्याचे आवाहन करतो.

सर्व पक्षांची सहमती

याआधीच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही तृणमूल काँग्रेसचा इंडिया आघाडीतील चर्चेला विरोध होता. मात्र, यावेळी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in