

डेहराडून : श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीमधील कथित देणगी गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि मंदिर समितीचा निलंबित कर्मचारी प्रमोद नौटियाल याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. नौटियाल मंदिर समितीच्या अध्यक्षांचा माजी स्वीय सहाय्यक आहे.
चमोली पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा नौटियाल याला त्याच्या डेहराडून येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला चौकशीसाठी बद्रीनाथ येथे नेण्यात आले असून, सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे, अशी माहिती चमोलीच्या पोलिसांनी दिली.
नौटियाल हा मंदिर समितीच्या अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर मंगळवारी रात्री उशिरा एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात आला होता. यापूर्वी मंदिर समितीच्या चार सदस्यांच्या चौकशी समितीनेही नौटियाल याच्यावरील आरोप प्रथमदर्शनी खरे असल्याचे म्हटले होते.
दरम्यान, बद्रीनाथ मंदिरातील देणगीच्या मोजदादी दरम्यान झालेल्या कथित गडबडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण प्रकाशात आले होते. त्यानंतर 'भैरव सेना' नावाच्या संघटनेने याप्रकरणी तक्रार दाखल करत उच्चस्तरीय चौकशी आणि एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती.
चोरीचे सबळ पुरावे
मंदिर समितीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून ८ जुलै रोजी बद्रीनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्राथमिक तपास आणि मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, नौटियाल हा काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम काढून घेत असल्याचे स्पष्ट दिसले. या सबळ पुराव्यांच्या आधारेच त्यांना अटक करण्यात आली आहे.