
छतरपूर : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम मंदिर परिसरात गुरुवारी आरतीच्या वेळी अचानक मंडप कोसळल्याने एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला आणि भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
मंदिरात मोठ्या संख्येने भाविक आरतीसाठी जमले होते. याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे किंवा बांधकामातील त्रुटींमुळे मंडप कोसळला. मंडपाच्या लोखंडी रॉडचा फटका डोक्याला लागल्याने ५० वर्षीय भाविक श्यामलाल कौशल यांचा जागीच मृत्यू झाला. श्यामलाल हे अयोध्येचे रहिवासी असून, त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात आहे.
दरम्यान, जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. प्रशासन आणि बागेश्वर धाम व्यवस्थापनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. पोलीस आणि रुग्णवाहिका पथके घटनास्थळी पोहोचली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, मंडप कोसळण्याचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
वाढदिवसाची तयारी
ही दुर्घटना बागेश्वर धामचे पीठाधीश पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या उत्सवाच्या तयारीदरम्यान घडली. ४ जुलै रोजी होणाऱ्या या उत्सवासाठी आणि गुरुपौर्णिमेसाठी देश-विदेशातून सुमारे ५० हजारांहून अधिक भाविक गढा गावात येण्याची अपेक्षा आहे. मंदिर परिसर सुंदरपणे सजवला जात आहे. १ ते ३ जुलै या कालावधीत धीरेंद्र शास्त्री बालाजीचा दिव्य दरबार आयोजित करणार आहेत, तर ४ जुलै रोजी त्यांची जयंती साजरी होणार आहे.