काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या वर्षी झालेल्या 'जेन-झी' आंदोलनावरील दडपशाही प्रकरणाचा अहवाल नेपाळमधील बालेंद्र शहा यांच्या नव्या सरकारने लागू केल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये नेपाळचे माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना शनिवारी सकाळी अटक करण्यात आली.
सीपीएन-यूएमएल अध्यक्ष असलेल्या ओली यांना काठमांडूपासून १२ किमी अंतरावर असलेल्या भक्तपूर जिल्ह्यातील गुंडू परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचप्रमाणे माजी गृहमंत्री आणि नेपाळी काँग्रेसचे नेते रमेश लेखक यांनाही त्यांच्या कटुंजे येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.
'जेन झी' आंदोलनादरम्यान आंदोलकांवर करण्यात आलेल्या हिंसक कारवाईत ७६ जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन डझनहून अधिक तरुणांचा समावेश होता. या प्रकरणी गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची शिफारस तपास आयोगाने केली होती.
ओली यांच्या अटकेनंतर त्यांच्या 'सीपीएन-यूएमएल' पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पक्षाने या कारवाईचा निषेध केला असून ओली यांच्या तात्काळ सुटकेची मागणी केली आहे. या अटकेच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी ३ वाजल्यापासून देशभर निदर्शने करण्याची घोषणा पक्षाने केली. तसेच रविवारी सर्व ७७ जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निषेध पत्रे सोपवली जाणार आहेत.