दिल्लीत ग्रीन फटाके विक्रीवर बंदीच ; सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली

सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ऑक्टोबर २०१८ मध्ये ग्रीन फटाके विक्रीस दिल्लीत बंदी घातली आहे.
दिल्लीत ग्रीन फटाके विक्रीवर बंदीच ; सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारली

नवी दिल्ली : दिल्ली राष्ट्रीय राजधानी प्रदेशात ग्रीन फटाक्यांच्या विक्रीला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच ऑक्टोबर २०१८ मध्ये ग्रीन फटाके विक्रीस दिल्लीत बंदी घातली आहे.

३० टक्के कमी प्रदुषण करणारे फटाके तयार करण्याची परवानगी फटाके उत्पादकांनी मागितली होती. या अर्जावर निर्णय देताना न्यायमूर्ती ए.एस. बोपण्णा आणि एम.एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने सांगितले, ‘आम्ही अर्जाला परवानगी दिली नाही. उलट आमच्या पूर्वीच्या बंदी आदेशाचे जेथे उल्लंघन होईल, तेथे सक्त कारवाई करावी.’ सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१८ मध्ये अर्जुन गोपाल यांच्या नेतृत्वाखाली तीन अल्पवयीन मुलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर निर्णय देताना फटाक्यांवर बंदी घातली होती. या मुलांनी दाखल केलेल्या याचिकेत फटाके उत्पादकांकडून बंदी आदेशाचे खुलेआम उल्लंघन होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयाला या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली होती.

२०१८ मध्ये न्यायालयाने घातलेली बंदी केवळ त्या वर्षीच्या दिवाळीपुरतीच मर्यादित होती, असे सांगून केंद्राने या अर्जाचे समर्थन केले होते, तर खंडपीठाने गेल्या आठवड्यात म्हटले होते, ‘जे एका वर्षासाठी चांगले आहे, ते सर्वकाळासाठी चांगले आहे.’ केंद्राने आपली बाजू मांडताना बेरियमवर बंदी नाही आणि तज्ज्ञ संस्थांनी सादर केलेल्या संशोधनात सुधारित किंवा ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण कसे कमी होईल, हे दिसून आले, असे सांगितले होते. केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयाला सांगितले की सुधारित फटाक्यांच्या चाचण्या सुरू आहेत. न्यायालयाने बंदी असतानाही फटाक्यांच्या सहज उपलब्धतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली होती आणि दिल्ली पोलिसांना त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी उचललेल्या पावलांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या कारवाईच्या अहवालात असे दिसून आले आहे, की २०१६ पासून ऑगस्ट २०२३ पर्यंत ९२६ विक्री/साठा प्रकरणे नोंदवण्यात आली होती, ज्यात ७४० लोकांना अटक करण्यात आली होती, तर २६००हून अधिक लोकांना फटाके फोडल्याबद्दल अटक करण्यात आली होती. खंडपीठाने पोलिसांना सांगितले होते की, ‘आतषबाजी केल्यानंतर कारवाई करण्यात काय अर्थ आहे. ते बाजारात कुठून येत आहेत, याचा स्रोत शोधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in