
श्रीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ने (टीआरएफ) स्वीकारली होती. त्याच ‘लष्कर-ए-तोयबा’चा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याचा शुक्रवारी बंदीपोरा येथे लष्करी जवानांनी खात्मा केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच केंद्र सरकारसोबतच भारतीय लष्कर ॲक्शन मोडमध्ये आले आहे. शुक्रवारी बंदीपोरा येथे सैन्याला मोठे यश मिळाले. लष्करी जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अल्ताफ लल्लीला चकमकीत ठार केले. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाच्या रेझिस्टन्स फोर्सने घेतली होती.
काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्याकडून सध्या सर्च मोहीम वेगाने सुरू आहे. बंदीपोरा भागात काही दहशतवादी असल्याची माहिती सैन्याला मिळाली. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. त्यावेळी लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. शुक्रवारी सकाळपासून या भागात जोरदार चकमक सुरू आहे. त्यात २ सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.