
बंगळुरू ही भारताची माहिती-तंत्रज्ञानाची राजधानी मुसळधार पावसात अक्षरश: बुडाली आहे. आयटी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यासाठी ५० रुपये देऊन ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागत आहे. तर काहींनी बुलडोझरच्या पुढील भागात बसून प्रवास केल्याचे दिसून येत आहे. शहरात सर्वत्र पाणीच पाणी असून अनेक खासगी गाड्या त्यात बुडाल्या आहेत.
पावसामुळे आमच्या कामावर परिणाम झाल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, “५० रुपये देऊन ट्रॅक्टरने ऑफिसला जात आहोत.” यावर कर्मचाऱ्यांच्या समस्येबाबत माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांशी बोलू, असे आश्वासन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले आहे.
तामिळनाडूत रेल्वे सेवा विस्कळीत
तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे निलगिरीत वाहतूक आणि इतर अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्या होत्या. कल्लार ते हिलग्रोव्ह दरम्यानचा रेल्वे ट्रॅक भूस्खलनामुळे मातीखाली गाडला गेला आहे. अनेक ठिकाणी दगडही पडले आहेत. त्यामुळे मेट्टुपलायम ते कुन्नूरदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
केरळातील पुरात दोन जणांचा मृत्यू
तिरुवनंतपुरमजवळ असलेल्या एका धबधब्याला मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. मनकायम धबधब्यावर १० जणांचा ग्रुप फिरायला गेला होता. हे लोक दगडावर होते. अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात दोन जण वाहून गेले. त्यात आठ वर्षांच्या मुलाचाही समावेश होता. हवामान खात्याने तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा आणि इडुक्की जिल्ह्यांत मंगळवारी रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय अलप्पुझा, कोयट्टम आणि एर्नाकुलममध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.