ढाका : बांगलादेशात रविवारी सार्वत्रिक निवडणूक होणार असून त्यात विद्यमान पंतप्रधान शेख हसीना सलग चौथ्यांदा विजयी होण्याची अपेक्षा आहे. शनिवारी सरकारविरोधात ४८ तासांचा देशव्यापी संप सुरू झाला. त्यात तुरळक हिंसाचार झाला. मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी इशारा दिला आहे की, निवडणुकीत काही अनियमितता आढळल्यास निवडणूक पूर्णपणे रद्द केली जाईल.
निवडणूक आयोगाने मतदानाची तयारी जवळपास पूर्ण केली आहे आणि सुरक्षा व्यवस्था देखील सुनिश्चित केली आहे. बांगलादेशात ३०० सदस्यांची संसद आहे. एका मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा नैसर्गिक कारणाने मृत्यू झाल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. देशाच्या निवडणूक आयोगानुसार एकूण ११९.६ दशलक्ष नोंदणीकृत मतदार रविवारच्या मतदानात ४२ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर मतदान करण्यास पात्र आहेत. यंदा ४३६ अपक्ष उमेदवारांसह २७ राजकीय पक्षांचे १५०० हून अधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
बंददरम्यान तुरळक हिंसाचार, जाळपोळ
कडक सुरक्षा व्यवस्था असूनही अज्ञात लोकांनी ६४ पैकी चार जिल्ह्यांमध्ये रिकाम्या मतदान केंद्रांवर घरगुती बनावटीचे बॉम्ब फेकून हल्ले केले, तर अन्य एका जिल्ह्यात बीएनपी कार्यकर्त्यांची पोलिसांशी चकमक झाली आणि पाच जण जखमी झाले. अग्निशमन सेवेच्या आकडेवारीनुसार शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत १६ तासांत किमान १४ जाळपोळीच्या घटना झाल्याची नोंद झाली आहे. ढाक्याजवळ शुक्रवारी रात्री एका पॅसेंजर ट्रेनमध्ये जाळपोळ केल्याने किमान चार जण ठार झाले.