बांगलादेशात हिंदूंची परिस्थिती चिंताजनक! मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता
कोलकात्ता : बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक असून ते कठीण परिस्थितीत जगत आहेत. बांगलादेशातील हिंदूंना आपल्या संरक्षणासाठी एकजुटीने राहणे गरजेचे आहे. जागतिक स्तरावरील हिंदूंनी त्यांना मदत करायला हवी, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
‘सायन्स सिटी ऑडिटोरियम’मध्ये संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, संघाचा कुणीही शत्रू नाही; परंतु ‘संघ वाढला तर ज्यांची दुकाने बंद होतील, तेच लोक संघाला विरोध करत आहेत.
बांगलादेशातील हिंदूंना आपल्या मर्यादेत जितकी मदत करता येईल. तितकी केली पाहिजे. कारण भारत हा एकमेव हिंदू देश आहे. भारत सरकारने बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.
संघाबद्दल समाजातील एका घटकामध्ये काही गैरसमज आहेत. या गैरसमजांना दिशाभूल करणारे प्रयत्न कारणीभूत आहेत. लोकांना संघाबाबत मत बनवण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, ती मते गैरसमजावर नाहीत तर वास्तवावर आधारित असावीत, असे त्यांनी सांगितले.
संघाचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. संघ हा हिंदू समाजाच्या उन्नती व संरक्षणासाठी कार्य करतो. भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ बनेल आणि त्या उद्देशासाठी समाजाची तयारी करणे हा संघाचा धर्म आहे, असे त्यांनी नमूद केले.
हिंदूंची शक्ती जागृत होत असून ती निश्चितच प्रकट होणार आहे. भारताचा उदय निश्चित असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, हिंदू धर्माचाही उभारी येणारा काळ ठरलेला आहे आणि त्यामुळे ‘वाईट लोक’ घाबरलेले आहेत. म्हणूनच भारत आणि संघासारख्या संघटनांविरोधात प्रचार अधिक जोरात केला जात आहे. लोकांनी अशा प्रचाराला बळी पडू नये म्हणून सत्य पोहोचवण्याबाबत मार्ग शोधण्यावरही संघ चर्चा करेल, असे त्यांनी नमूद केले.
आपल्या शेजारील देशांमध्ये, जे पूर्वी भारताचा भाग होते, जर सर्व काही ठीक राहिले तर आपल्या स्थितीवरही त्याचा चांगला परिणाम होईल. अशा विषयांवर सरकार आपली धोरणे ठरवेल, परंतु समाज ते समाज पातळीवर एकमेकांच्या हिताची कामना करण्यावर आम्हाला चर्चा करायची आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
स्वदेशी वस्तूंचा आग्रह धरा!
भागवत म्हणाले की, ज्या वस्तू देशात तयार होऊ शकतात त्या परदेशातून विकत घेऊ नयेत. फक्त स्थानिकांना उत्पन्न देणाऱ्या वस्तूंची खरेदी करावी. जनतेने देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांची भटकंती करावी, देशातच भ्रमंती करावी, असे त्यांनी सुचवले.

