

भारत-बांगलादेशमधील तणाव वाढलेला असताना पश्चिम बंगालमधील भारत–बांगलादेश सीमेजवळ हकीमपूर परिसरात शाळेत जाण्यासाठी निघालेल्या भारतीय विद्यार्थिनींची एक बांगलादेशी नागरिक खुलेआम छेड काढत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. 'एशियानेटन्यूज'च्या वृत्तानुसार हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियासह स्थानिकांमध्येही संताप उसळला असून सीमावर्ती भागातील सुरक्षा, गस्त आणि देखरेख याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रकारामुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या संवेदनशील सीमावर्ती पट्ट्यात अशी घटना कशी घडली, याबाबत संताप व्यक्त होत आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरत असला तरी अद्याप बीएसएफ किंवा कोणत्याही सरकारी यंत्रणेकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे व्हिडिओ खरा आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या मतदार यादीच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेमुळे अनेक बांगलादेशी नागरिक अटकेच्या भीतीने हकीमपूर चेकपोस्टमार्गे स्वेच्छेने बाहेर पडत आहेत, असे स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे.
बघा व्हिडिओ
सोशल मीडियावर संतापाची लाट
हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. सीमावर्ती भागातील सुरक्षाव्यवस्थेला बळकटी देण्याची मागणी जोर धरत आहे. व्हिडिओखाली कमेंटमध्ये लोक व्यक्त होत आहेत.
भारत-बांगलादेश तणावाच्या पार्श्वभूमीवर घटना गंभीर
सध्या दोन्ही देशांमध्ये अवैध स्थलांतर, राजकीय अस्थिरता, व्यापारातील वाद, तसेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात असल्याने निर्माण झालेली राजकीय संवेदनशीलता अशा अनेक कारणांमुळे तणाव वाढलेला आहे. व्यापारातील प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे लॉजिस्टिक्स क्षेत्रावरही मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, सीमेवरील गस्त वाढवावी, निगराणी कडक करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.