पाच दशकांनंतर उघडले बांके बिहारी मंदिराचे तळघर; सोने, चांदीच्या सळ्या, प्राचीन भांडी, जुनी तांब्याची नाणी सापडली

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या आदेशानुसार मथुरा येथील बांके बिहारी मंदिराचे तळघर रविवारी उघडण्यात आले. गेल्या ५४ वर्षांपासून भाविकांना या मंदिराच्या तळघरात दडलेल्या ‘खजिन्या’बाबत आणि इतर गोष्टींबाबत उत्सुकता होती. १८ व १९ ऑक्टोबर रोजी दोन दिवस चाललेल्या या निरीक्षण प्रक्रियेनंतर तळघरातील वस्तूंची यादी समोर आली आहे.
पाच दशकांनंतर उघडले बांके बिहारी मंदिराचे तळघर; सोने, चांदीच्या सळ्या, प्राचीन भांडी, जुनी तांब्याची नाणी सापडली
Published on

मथुरा : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीच्या आदेशानुसार मथुरा येथील बांके बिहारी मंदिराचे तळघर रविवारी उघडण्यात आले. गेल्या ५४ वर्षांपासून भाविकांना या मंदिराच्या तळघरात दडलेल्या ‘खजिन्या’बाबत आणि इतर गोष्टींबाबत उत्सुकता होती. १८ व १९ ऑक्टोबर रोजी दोन दिवस चाललेल्या या निरीक्षण प्रक्रियेनंतर तळघरातील वस्तूंची यादी समोर आली आहे.

काही निरीक्षण कार्य पूर्ण करण्यासाठी तळघर उघडण्यात आले होते. हे तळघर १९७१ नंतर पहिल्यांदाच उघडण्यात आले. दुपारी १ वाजता निरीक्षण कार्य सुरू करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या समितीमधील सदस्य, मंदिराचे पुजारी व सुरक्षारक्षक उपस्थित होते.

सर्वप्रथम मंदिराच्या तळघराचा दरवाजा कटरने कापण्यात आला. त्यानंतर उच्चाधिकार समितीचे सदस्य, पुजारी व सुरक्षारक्षक आत गेले. त्यांनी तळघराचे, तेथील वस्तूंचे निरीक्षण करून एक यादी तयार केली आहे. यावेळी तळघरातून सोने आणि चांदीच्या सळ्या, शेकडो प्राचीन भांडी आणि जुनी तांब्याची नाणी बाहेर काढण्यात आली. तसेच काही दगडही आत सापडले आहेत. एका पेटीत चांदीच्या तीन सळ्या, गुलाल लावण्यात आलेली एक सळी सापडली आहे जी पूर्वी वापरली जात होती, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

अनेक वस्तूंना वाळवी

तळघर पहिल्या दिवशी उघडले तेव्हा आत खूप धूळ व माती होती, तळघरातील अनेक वस्तूंना वाळवी लागल्याचे निदर्शनास आले. तसेच तळघरात काही साप दिसले. त्यामुळे वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवले. तळघरात काही पेट्याही सापडल्या आहेत.

मोठा खजिना नाही

मथुरेतील श्री बांके बिहारी मंदिराच्या तळघरात मोठा खजिना आहे. या कथित खजिन्याची नेहमीच चर्चा ऐकायला मिळते. मात्र, तळघर उघडल्यानंतर आत मोठा खजिना सापडलेला नाही. काही सोन्या-चांदीच्या सळ्या, तांब्याची नाणी, तांब्याची व पितळेची भांडी आढळली आहेत. दिवाणी कनिष्ठ न्यायाधीश, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, बांके बिहारी मंदिर न्यासाचे पदाधिकारी आणि सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत आज तळघर उघडण्यात आले होते. दोन दिवस तळघर उघडून आतील वस्तूंची यादी तयार करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in