बँका येत्या रविवारीही राहणार सुरू; अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय

२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने (यूएफबीयू) पुकारलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपामुळे नागरिकांच्या बँकिंग सेवांच्या गरजांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.
बँका येत्या रविवारीही राहणार सुरू; अर्थ मंत्रालयाचा मोठा निर्णय
'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : 'युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स'ने (यूएफबीयू) पुकारलेल्या संपामुळे ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व बँका रविवारी, २७ सप्टेंबर रोजीही सुरू राहतील, असे अर्थ मंत्रालयाने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे. बँकिंग क्षेत्रातील ९० टक्के कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व असल्याचा दावा करणाऱ्या संघटनेने २८ सप्टेंबरपासून तीन दिवसांचा संप पुकारला आहे.

आठवड्यातून ५ दिवस कामकाज ही त्यांची प्रमुख मागणी आहे. हा संप झाल्यास तो बँकिंग क्षेत्रातील सहामाही लेखाजोखा पूर्ण करण्याच्या कालावधीशी (३० सप्टेंबर) जुळून येईल. २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी बँक संपामुळे नागरिकांच्या बँकिंग सेवांच्या गरजांवर परिणाम होऊ नये यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.

जनतेच्या बँकिंगविषयक महत्त्वाच्या गरजांवर दीर्घकाळ विपरीत परिणाम होऊ नये यासाठी सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका २७ सप्टेंबर रोजी - रविवारी नेहमीप्रमाणे कामकाज करतील, असे म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबर रोजी सर्व बँक शाखा, कार्यालये, एटीएम-संबंधित शाखा आणि 'करन्सी चेस्ट' (रोख रक्कम साठवणूक केंद्रे) पूर्णपणे कार्यरत ठेवण्यास मंजुरी दिली आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे. \

अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या 'वित्तीय सेवा विभागाने' पुन्हा एकदा स्पष्ट केले की, बँक ग्राहकांचे हित आणि सोय ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सरकार आणि बँक व्यवस्थापनांनी युनियन्सना प्रस्तावित संप पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे, तसेच अत्यावश्यक बँकिंग सेवा विनाअडथळा सुरू राहतील याची खात्री करण्यासाठी उपाययोजनाही केल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

संघटनेच्या इतर मागण्यांमध्ये पेन्शनमध्ये सुधारणा, सर्व पेन्शनधारकांसाठी महागाई भत्त्याचे (डीए) एकसमान सूत्र आणि 'नॅशनल पेन्शन सिस्टम' अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना 'ओल्ड पेन्शन स्कीम'मध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे. संप झाल्यास बँकिंग गरजांसाठी मोबाईल बँकिंग, एटीएम, इंटरनेट बँकिंग, बीसी पॉईंट आणि यूपीआय यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करावा, अशा सूचना अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ग्राहकांना देण्यास सुरुवात केली आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी, प्रस्तावित संप सुरू होण्यापूर्वीच अत्यावश्यक बँकिंग व्यवहार पूर्ण करावेत, असा सल्लाही बँकांनी ग्राहकांना दिला आहे.

प्रस्तावित ३ दिवसांचा संप आणि बँकांचे ३० सप्टेंबर रोजी होणारे अर्ध-वार्षिक लेखा-समापन एकाच वेळी येत आहेत; ही तारीख खात्यांचा ताळमेळ, तरतूद आणि तिजोरी व बाजारपेठेतील व्यवहारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in