‘बारसू रिफायनरी’ला गती मिळणार पंतप्रधान मोदी आणि सौदीचे युवराज यांच्या भेटीत चर्चा

सौदी अरेबिया भारतात विविध क्षेत्रांत सुमारे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे
‘बारसू रिफायनरी’ला गती मिळणार पंतप्रधान मोदी आणि सौदीचे युवराज यांच्या भेटीत चर्चा

नवी दिल्ली : भारतभेटीवर आलेले सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलाझीझ अल-सौद यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वैयक्तिक भेट घेऊन द्विपक्षीय संबंध सुधारण्यावर सविस्तर चर्चा केली. त्यात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बारसू येथे प्रस्तावित खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्पाला गती देण्यावर विशेष भर होता.

नवी दिल्लीत पार पडलेल्या जी-२० संघटनेच्या शिखर परिषदेसाठी सौदी युवराज भारतात आले होते. त्यानंतर त्यांनी सोमवारी पंतप्रधान मोदी यांची वैयक्तिक भेट घेतली. भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलची घोषणा २०१९ साली करण्यात आली होती. त्याची पहिली बैठक सोमवारी पंतप्रधान मोदी आणि सौदी युवराज बिन सलमान यांच्यात पार पडली. त्यात या विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली.

सौदी अरेबिया भारतात विविध क्षेत्रांत सुमारे १०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ऊर्जा, संरक्षण, सोमीकंडक्टर, अंतराळ संशोधन आदी क्षेत्रांत ही गुंतवणूक होणार आहे. त्यासंदर्भातील आठ करारांवर मोदी आणि युवराज बिन सलमान यांच्या भेटीत स्वाक्षऱ्या झाल्या. ही गुंतवणूक योग्य प्रकारे मार्गी लावण्यासाठी दोन्ही देशांच्या संयुक्त टास्क फोर्सची स्थापना करण्यावर या भेटीत एकमत झाले.

सौदी अरेबियाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० अब्ज डॉलर्स द वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रोजेक्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या खनिज तेलशुद्धीकरण प्रकल्पात गुंतवले जाणार आहेत. या प्रकल्पाची सर्वप्रथम २०१५ साली घोषणा झाली होती. सौदी अराम्को, अॅडनॉक आणि भारतीय कंपन्या अशी त्यात तिहेरी भागीदारी आहे. सुरुवातीला तो प्रकल्प कोकणातील नाणार येथे उभा केला जाणार होता. मात्र, स्थानिक विरोधामुळे तो बारसू येथे हलवण्यात आला. या प्रकल्पाला गती देण्याबाबत मोदी-युवराज बिन सलमान यांच्यात प्रामुख्याने चर्चा झाली.

भारत-सौदी अरेबिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलच्या बैठकीत सोमवारी मोदी आणि बिन सलमान यांनी द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची भागीदारी पुढील स्तरावर नेण्यासाठी अनेक उपक्रम ओळखले गेले आहेत. आजच्या बैठकीनंतर उभय देशांच्या संबंधांना एक नवीन दिशा आणि ऊर्जा मिळेल. सौदी युवराजांनी जी-२० परिषदेच्या यशाबद्दल मोदींचे अभिनंदन केले.

प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्य आणि कल्याणासाठी भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी महत्त्वपूर्ण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलाझीझ अल-सौद यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सांगितले. सौदी अरेबिया हा भारताचा सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, दोन्ही देश बदलत्या काळाच्या अनुषंगाने संबंधांना नवे आयाम देत आहेत.

सौदी अरेबिया हा मध्य-पूर्वेतील भारताचा प्रमुख धोरणात्मक भागीदार आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांमधील एकूण संबंधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्याद्वारे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी मजबूत करण्यावरही भर दिला आहे. तत्कालीन लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी डिसेंबर २०२० मध्ये सौदी अरेबियाला भेट दिली होती. तेव्हापासून दोन्ही देशांमधील उच्चपदस्थ लष्करी अधिकाऱ्यांच्या भेटींची मालिका सुरू आहे.

धोरणात्मक भागीदारीला नवी उंची

- भारत-सौदी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कौन्सिलची पहिली बैठक संपन्न

- सौदी अरेबिया भारतात १०० अब्ज डॉलर्स गुंतवणार

- निम्मी गुंतवणूक द वेस्ट कोस्ट रिफायनरी प्रोजेक्टमध्ये

- गुंतवणूक मार्गी लावण्यासाठी संयुक्त टास्क फोर्स

logo
marathi.freepressjournal.in