

भोपाळ : उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो, न जाने किस गली में जिंदगी की शाम हो जाए हा गाजलेला शेर लिहिणारे डॉ. बशीर बद्र (वय ९१) यांचे गुरुवारी निधन झाले. उर्दू शायरीचे बादशहा अशी ओळख असणाऱ्या बद्रसाहेबांनी भोपाळमध्ये त्यांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.
डॉ. बद्र यांच्या शायरीत प्रेमाचा प्रामाणिकपणा, जीवनातील कटुता, शहरी जीवनाची अस्वस्थता आणि भारतीय मातीचा सुगंध यांचा संगम आहे. उर्दू साहित्याचा आत्मा असलेले बशीर बद्र गेल्या जवळपास 14 वर्षांपासून स्मृतिभ्रंशाने ग्रस्त होते, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती क्षीण झाली होती. एक काळ असा होता की त्यांच्याशिवाय मुशायरे अपूर्ण मानले जायचे. १५ फेब्रुवारी १९३५ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे जन्मलेल्या बशीर बद्र यांनी लहान वयातच शायरी लिहायला सुरुवात केली.
१९८७ च्या मेरठ दंगलींमध्ये त्यांचे घर जाळण्यात आले. ही घटना त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. त्यांनी ही वेदना आपल्या शेरात मांडली. या घटनेनंतर, त्यांनी भोपाळला आपले घर बनवले आणि तिथे स्थायिक झाले.