Modi BBC Documentary : पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीचा हैदराबाद विद्यापीठात शो

गुजरात दंगलीवर आधारित ‘बीबीसी’ (Modi BBC Documentary) वाहिनीची वादग्रस्त डॉक्युमेंटरी हैदराबादमधील विद्यापीठात दाखवण्यात आली
Modi BBC Documentary : पंतप्रधान मोदींच्या वादग्रस्त डॉक्युमेंटरीचा हैदराबाद विद्यापीठात शो
Published on

'बीबीसी' वाहिनीने (Modi BBC Documentary) बनवलेली गुजरात दंगलींवरील वादग्रस्त डॉक्युमेंटरी देशभरातून केंद्र सरकारने सर्व समाजमाध्यमांवरून ब्लॉक केली आहे. तरीही, हैदराबाद विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी या डॉक्युमेंटरीचा एक शो आयोजित करण्यात आला होता. यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘फ्रॅटर्निटी मूव्हमेंट’ या विद्यार्थ्यांच्या गटाने आयोजित केलेल्या या डॉक्युमेंटरीचा पहिला भाग जवळपास २०० विद्यार्थ्यांनी बघितला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यासर्व प्रकरणावर ‘फ्रॅटर्निटी मूव्हमेंट’च्या एका सदस्याने सांगितले की, "ही डॉक्युमेंटरी ब्लॉक करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. ही डॉक्युमेंटरी राजकीय नेत्यांना आरसा दाखवणारी असून देशाचे कुरूप वास्तव दाखवणारी आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना खूप असुरक्षित वाटते आहे. प्रशासनाविरोधात उठणारे आवाज सत्ताधाऱ्यांकडून दाबत असल्यामुळे या डॉक्युमेंटरीचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले,” यावरून आता केंद्र सरकार काय कारवाई करते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ नावाने बीबीसीने एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. यामध्ये दोन भाग असल्याची माहिती देण्यात आली आहे. २००२मध्ये घडलेल्या गुजरात दंगलीवर आधारित ही डॉक्युमेंटरी असून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारची भूमिका काय होती, याचे चित्रण या डॉक्युमेंटरीत करण्यात आले आहे. जागतिक पातळीवरही या डॉक्युमेंटरीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर माहिती आणि दूरसंचार मंत्रालयाने शुक्रवारी यूट्यूब आणि ट्विटरवर ही डॉक्युमेंटरी आणि त्या संदर्भातील पोस्ट ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले. सोशल मीडिया माध्यमांनी केंद्राची ही मागणी मान्य करून त्यावर त्वरित कारवाई केली.

logo
marathi.freepressjournal.in