उत्तर प्रदेशातील ‘जंगलराज’मध्ये महिला असणे हाच गुन्हा -प्रियांका

उत्तर प्रदेशातील ‘जंगलराज’मध्ये महिला असणे हाच गुन्हा -प्रियांका

महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली.

नवी दिल्ली : महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी-वढेरा यांनी गुरुवारी उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेशमधील 'जंगलराज'मध्ये महिला असणे हाच गुन्हा असल्याचे गांधी-वढेरा म्हणाल्या.

सामूहिक बलात्काराच्या शिकार ठरलेल्या दोन अल्पवयीन मुलींनी कानपूरमध्ये आत्महत्या केली आणि आता त्यांच्या वडिलांनीही आत्महत्या केली. पीडित मुलींच्या कुटुंबीयांवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, असा आरोप करण्यात आला असल्याचे प्रियांका गांधी-वढेरा यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये पीडित मुली अथवा महिलांनी न्याय मागितला तर त्यांच्या कुटुंबाचा विनाश करावयाचा हा आता नियमच झाला आहे. उन्नाव, हाथरसपासून ते कानपूरपर्यंत जेथे महिलांचा छळ झाला त्यांच्या कुटुंबीयांना संपविण्यात आले आहे, असा आरोपही प्रियांका यांनी केला.

उत्तर प्रदेशातील जंगलराजमध्ये महिला असणे हाच आता गुन्हा झाला आहे, तेथे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लकच नाही, राज्यातील कोट्यवधी महिलांनी काय करावयाचे आणि कोठे जावयाचे, असेही त्यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in