कोलकाता : बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात येईल आणि त्यासाठी पुढील आठवड्यात राज्य विधिमंडळात, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांमध्ये सुधारणा केली जाईल, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी येथे स्पष्ट केले. बलात्कारासारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत आपले सरकार सहन करणार नाही, असेही त्या म्हणाल्या.
सुधारित विधेयकाला मान्यता देण्यास राज्यपालांनी विलंब केला अथवा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठविण्यास विलंब केला, तर आपण राज भवनाबाहेर धरणे धरू, असेही ममता यांनी सांगितले. बलात्काराच्या आरोपात दोषी ठरलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याचा कायदा करावा यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी येत्या शनिवारपासून तृणमूल काँग्रेस तळागाळातील स्तरापर्यंत चळवळ उभी करील, असेही त्या म्हणाल्या.
गेल्या २० दिवसांपासून कामावर हजर न राहिलेल्या आंदोलनकर्त्या डॉक्टरांना त्यांनी सेवेत हजर राहण्याची विनंती यावेळी केली. सुरुवातीपासूनच आपल्याला डॉक्टरांबद्दल सहानुभूती आहे, घटना घडून अनेक दिवस होऊनही सरकारने डॉक्टरांवर कारवाई केलेली नाही. आम्हाला तुमच्या वेदनांची जाणीव आहे. रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याने लवकरात लवकर सेवेत रुजू व्हा, असे आवाहन ममता यांनी डॉक्टरांना केले आहे.
मोदी...तुमची खुर्चीही आम्ही खिळखिळी करू शकतो !
भाजपने बंगाल पेटता ठेवला तर त्याचे परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भोगावे लागतील, अशा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. काही जणांना हा बांगलादेश आहे असे वाटते, बांगलादेशावर आपले प्रेम आहे कारण ते आमचीच भाषा बोलतात आणि संस्कृतीही आमच्यासारखीच आहे. परंतु, लक्षात असू द्या की हा बांगलादेश नाही, तर भारत हा स्वतंत्र देश आहे. मोदी तुम्ही पश्चिम बंगाल पेटत ठेवण्यासाठी भाजपचा वापर करीत आहात, तुम्ही पश्चिम बंगाल पेटत ठेवलात तर आसाम, ईशान्य, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओदिशा आणि दिल्लीत त्याची धग बसेल, आम्ही तुमची खुर्चीही खिळखिळी करू शकतो याची जाणीव असू द्या, असा इशाराही ममता यांनी तृणमूल काँग्रेस छात्र परिषदेच्या स्थापना दिन मेळाव्यात दिला.
घोष यांचे सदस्यत्व रद्द
आर. जी. कर रुग्णालय आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांचे सदस्यत्व बुधवारी भारतीय वैद्यकीय संघटनेने (आयएमए) रद्द केले. डॉ. घोष हे ‘आयएमए’च्या कोलकाता शाखेचे उपाध्यक्ष असून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय शिस्तभंग समितीने घेतला.
ममतांचे आवाहन डॉक्टरांनी फेटाळले
डॉक्टरांनी सेवेत रुजू व्हावे, हे ममता बॅनर्जी यांनी केलेले आवाहन आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी फेटाळून लावले आहे. बलात्कार करून हत्या करण्यात आलेल्या डॉक्टरला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे आर. जी. कर रुग्णालय आणि महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांना आरोग्य सेवेतून निलंबित करावे आणि कोलकाता पोलीस आयुक्तांनाही निलंबित करावे, आदी मागण्याही डॉक्टरांनी केल्या आहेत.
भाजपच्या ‘बंद’मुळे जनजीवन विस्कळीत
राज्याच्या मुख्यालयाजवळ आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने बुधवारी पश्चिम बंगालमध्ये १२ तासांचा ‘बंद’ पुकारला होता, त्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळपासूनच अनेक ठिकाणी रेल्वे आणि रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक परिवहन व्यवस्था विस्कळीत झाली आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. बस, रिक्षा, आणि टॅक्सी रस्त्यावर कमी प्रमाणात धावत होत्या. काही ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये सुरू होती, मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. खासगी कार्यालयांमध्येही उपस्थिती कमी होती, सरकारी कार्यालयांमध्ये कामकाज नियमितपणे सुरू होते. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली.
भाजप कार्यकर्त्याच्या गाडीवर गोळीबार
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील भाटपारा येथे भाजप कार्यकर्त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. भाजपने टीएमसीवर या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप केला आहे. भाटपारा येथील स्थानिक भाजप नेते प्रियंगू पांडे यांच्या कारवर गोळीबार झाला. यावेळी कारमध्ये बसलेले भाजप समर्थक रवी सिंह यांना दुखापत झाली आहे.