

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये बॅचलर तरुण-तरुणाईला भाड्याच्या घरात राहण्यासाठी वणवण फिरावं लागतं, तरीही घर मिळत नाही. बहुतांश सोसायटींच्या गेटवरच 'बॅचलर्सना घर भाड्याने मिळणार नाही' अशा पाट्या लागलेल्या असतात. याबाबतच्या अनेक बातम्या वारंवार समोर आल्यात. पण, आता चक्क स्वतःच्या मालकीच्याच घरात सोसायटीच्या कमिटी मेंबर्सने दमदाटी करून धमकावल्याचा आणि घर खाली करायला सांगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बंगळुरूमधील एका नामांकित सोसायटीत राहणाऱ्या २२ वर्षीय लॉच्या विद्यार्थिनीला स्वतःच्या घरातच अत्यंत त्रासदायक अनुभवाला सामोरे जावे लागले. या तरुणीने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे सांगितल्यानंतर आता तिची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.
नेमकं काय झालं?
तरुणीने पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, शनिवारी रात्री तिच्या घरी पाच मित्र आले होते. ज्यामध्ये ४ मुलं आणि १ मुलगी होती. अजिबात गोंधळ-गोंगाट किंवा पार्टी सुरू नव्हती. "आम्ही फक्त स्वयंपाक करत होतो आणि शांतपणे बोलत होतो," असं ती सांगते. मात्र, अचानक सोसायटीतील एका ज्येष्ठ व्यक्तीने दरवाजा ठोठावला आणि, "बॅचलर्सना इथे परवानगी नाही, घरमालकाला फोन लावा," असं सांगितलं. त्यावर “मीच या घराची मालक आहे" असे उत्तर देत तरुणीने दार बंद करून घेतले. यामुळे अपमानित झालेल्या त्याने थोड्याच वेळात अन्य ४-५ जणांना सोबत आणलं. दुसऱ्या दिवशी घर रिकामं करण्याची धमकी दिली आणि दारू, सिगारेट, गांजा ओढत असल्याचा आरोप करत तपासणीच्या नावाखाली ते परवानगी न घेता थेट तरुणीच्या घरात शिरले. पण, तिथे उपस्थित तिच्या मित्रांनी त्यांना रोखलं, यादरम्यान वादही झाला, तिच्या मित्रांनी एकाच्या कानशिलातही लगावली आणि अखेर त्यांना घरातून हुसकावून लावले. नंतर सोसायटीच्या मेंबर्सनी पोलिसांना बोलावले, पोलिसांनी घराचे मालक कोण अशी विचारणा केली. त्यावर तरुणीने आपणच मालक असल्याचे त्यांना सांगितले. पोलिसांनी कागदपत्र मागितली असता ती देण्यास मात्र तरुणीने नकार दिला आणि 'आम्ही काहीही चुकीचे करत नव्हतो आणि त्यांना (सोसायटी सदस्य) माझ्या घरात शिरण्याचा कोणताही अधिकार नाही', असे सांगितले. घडलेला सर्व प्रकार घरातल्या लिव्हिंग रूममधील सीसीटीव्हीतही कैद झाला होता.
कायदेशीर नोटीसनंतर आले वठणीवर
वडिलांनी सांगितल्यामुळे घरात सीसीटीव्ही लावल्याचेही तिने पोस्टमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणानंतर तरुणीने कायदेशीर पाऊल उचललं. "मी सोसायटीला आणि घरात घुसणाऱ्या सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना कायदेशीर नोटीस पाठवली. सीसीटीव्हीचे व्हिडिओ फूटेज सोसायटीचा बिल्डर आणि चेअरमन यांना दाखवल्यानंतर मात्र त्यांची चांगलीच धावपळ उडाली. सोसायटीची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व पुरावे दाखवण्यात आले. संबंधित लोकांना सोसायटी बोर्डवरून हटवण्यात आलं, प्रत्येकी २० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आणि त्यांना लेखी माफीही मागायला लागली. यानंतरही तरुणी थांबली नाही. आरोपींनी पुन्हा कधीही संपर्क साधू नये या आदेशासह ६२ लाख रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारा दिवाणी खटला तिने दाखल केला आहे. हा खटला दाखल करून घेण्यात आला असून, पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे, असेही तिने सांगितले. खटला दाखल झाल्यानंतर आरोपींच्या घरातील महिलांनी 'सेटलमेंट'साठी तिची भेटही घेतली होती. पण, तरुणीने सपशेल नकार दिला. 'मी स्वतः मालक असताना जर मला असा अनुभव येत असेल तर भाड्याच्या घरात राहणाऱ्यांची काय परिस्थिती असेल याचा विचारच करवत नाही', असे ती अखेरीस म्हणाली. या प्रकरणात पुढे काय घडतं, याची माहितीही सुनावणीनंतर देईल, असे तरुणीने सांगितले आहे.
नेटकऱ्यांकडून कौतुक
तिची ही पोस्ट आता चांगलीच व्हायरल झाली असून विशेषतः बॅचलर्स लोकांकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. बंगळुरूला तुझ्यासारख्या अजून लोकांची गरज आहे, तू खरंच चांगला धडा शिकवलास, अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, मी स्वतः कायद्याचं शिक्षण घेत असल्यामुळे सोसायटी मेंबर्स विनाकारण जास्त त्रास देऊ शकले नाहीत, असेही सांगायला तरुणी विसरली नाही.