नवऱ्यासारखा दिसतो, म्हणून मुलाला संपवले; गोव्याच्या रुममध्ये चिठ्ठीही सापडली; सूचना सेठबाबत धक्कादायक खुलासा!

सूचना आणि वेंकटरमन यांनी 2010 साली प्रेमविवाह केला होता. त्यांना 2019 मध्ये मुलगा झाला. याकाळात दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले.
नवऱ्यासारखा दिसतो, म्हणून मुलाला संपवले; गोव्याच्या रुममध्ये चिठ्ठीही सापडली; सूचना सेठबाबत धक्कादायक खुलासा!

पणजी : स्वतःच्याच चार वर्षांच्या मुलाचा खून करणाऱ्या सूचना सेठ हिच्याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. सूचना आपला पती वेंकटरमनचा द्वेष करत होती. मुलाचा चेहरा पतीसारखा दिसत आहे. त्यामुळे तिला समोर पती वेंकटरमन दिसत होता, अशी नवीन माहिती समोर आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. याशिवाय गोव्यात ज्या ठिकाणी ती भाड्याने राहिली होती त्या खोलीत एक चिठ्ठीही पोलिसांना सापडली आहे.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, बंगळुरूच्या स्टार्टअप कंपनीत सीईओ म्हणून काम करणारी सूचना आपल्या मित्र व कुटुंबीयांना सांगत होती, मुलाचा चेहरा माझ्या पतीशी मिळताजुळता आहे. त्यामुळे पतीसोबत विभक्त झाल्यानंतरही तिला मुलात तो दिसत होता, असे तिने सांगितले. वेंकटरमनने सूचनाला फोन केला होता. त्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. वेंकटरमनला न्यायालयाकडून याची परवानगीदेखील मिळाली होती. तो आठवड्यातून एकदा मुलाला व्हिडीओ कॉल करू शकत होता. वेंकटरमनने रविवारी आपल्या मुलाला बंगळुरू येथील आपल्या घरी आणण्याचे सूचनाला सांगितले होते. मात्र, पतीपासून विभक्त झालेल्या सूचनाने त्याची मागणी धुडकावून लावली होती.

'आयलाइनर'ने लिहिलेली चिठ्ठी-

दरम्यान, गोव्यात सूचनाच्या खोलीमध्ये तपासणीदरम्यान फॉरेन्सिक टीमला चुरगळलेल्या टिश्यू पेपरच्या तुकड्यावर एक हस्तलिखित चिठ्ठी सापडली. ही चिठ्ठी सूचनाने आयलाइनर वापरून लिहिली होती. ती चिठ्ठी फाडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पोलिसांनी सूचनाच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले आहेत आणि ते चिठ्ठीसह फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडे तज्ज्ञांकडून तपासणीसाठी पाठवले आहेत. नवऱ्याकडे मुलाचा ताबा जाऊ नये याबाबत तिने चिठ्ठीत लिहिले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मुलाच्या ताब्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईबाबतच्या किमान पाच ओळी त्यावर लिहिल्या होत्या. 'या टप्प्यावर नोटमधील नेमका मजकूर उघड करता येणार नाही कारण त्यामुळे तपासात अडथळे येतील' असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

असा आला नात्यात दुरावा-

सूचना आणि वेंकटरमन यांनी 2010 साली प्रेमविवाह केला होता. त्यांना 2019 मध्ये मुलगा झाला. याकाळात दोघांमध्ये मतभेद व्हायला लागले. अद्याप दोघांचा घटस्फोट झाला नसला तरी यासाठीचा अर्ज कोर्टात दाखल आहे. याप्रकरणी झालेल्या सुनावणीत सूचना यांच्याकडे मुलाचा ताबा देण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

एका एआय स्टार्टअपची सीईओ असलेल्या सूचना सेठ (३९) हिने स्वतःच्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. गोव्यामध्ये मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये कोंबून कॅबमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून सोमवारी संध्याकाळी पोलिसांनी अटक केली. सूचनाने शनिवारी उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासह चेक-इन केले होते आणि सोमवारी सकाळी एकटीनेच चेक आउट केले होते. हाऊस-कीपिंग कर्मचार्‍यांपैकी एक कर्मचारी सोमवारी अपार्टमेंट साफ करण्यासाठी गेला असता त्याला काही रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कळंगुट पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी हातात बॅग घेऊन तिच्या मुलाशिवाय हॉटेलमधून जाताना दिसल्याने या घटनेचा खुलासा झाला.

गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि सूचनाशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा मुलाला गोव्यातील फातोर्डा येथील मित्राकडे सोडल्याचे तिने सांगितले. तिची उत्तरे संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाला पुन्हा फोन केला, यावेळी त्याच्याशी कोकणीमध्ये बोलले आणि प्रवाशाला काहीही न सांगता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गाडी घेऊन जाण्यास सांगितले. तोपर्यंत टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली होती. चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर कर्नाटक पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या बॅगमध्ये सापडला आणि तिला ताब्यात घेतले.

कोण आहे सूचना सेठ? -

सूचना सेठ, एक डेटा सायंटिस्ट असून ‘द माइंडफुल एआय लॅब’ या टेक कन्सल्टन्सीची संस्थापक आणि सीईओ आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स एक्सपर्ट आहे. डेटा सायन्स आणि स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा 12 वर्षांचा अनुभव आहे. ती AI एथिक्स लिस्टमधील 100 ब्रिलियंट महिलांमध्ये होती आणि बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील हार्वर्ड विद्यापीठातील बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलो देखील होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in