

बंगळुरूतील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बॅडमिंटन खेळत असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकल्या मुलाला एका व्यक्तीने पाठीमागून फुटबॉलला किक मारतात त्याप्रमाणे जोरदार लाथ मारल्याचा प्रकार घडला असून, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
१४ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास ओल्ड पोस्ट ऑफिस रोड, त्यागराजनगर परिसरात ही घटना घडली. आरोपी रंजीत ऊर्फ रंजन (वय ३५), हा त्याच परिसरातील रहिवासी असून तो पूर्वी जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. तर, पीडित चिमुकला आपल्या मामाच्या घरी त्यागराजनगर येथे आला होता.
मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, ती आपल्या मोठ्या भावाच्या घरी आलेली असताना तिचा मुलगा इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत होता. त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या रंजीतने अचानक धावत येत चिमुकल्याच्या पाठीवर जोरात लाथ मारली. लाथ बसताच मुलगा जमिनीवर कोसळला. त्याच्या भुवईजवळ रक्तस्राव झाला असून हात-पायांवरही जखमा झाल्यात. कुटुंबीयांनी तात्काळ त्याच्यावर उपचार केले. मुलाच्या आईने त्याच दिवशी पोलिसांकडे धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर दुसऱ्या दिवशी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२) अंतर्गत ‘जाणीवपूर्वक दुखापत केल्याचा’ गुन्हा नोंदवण्यात आला.
कुटुंबीय म्हणतात - मानसिक समतोल बिघडलाय
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी अविवाहित असून मानसिक समतोल बिघडला आहे आणि सध्या तो मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार घेतोय, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तो बहुतेक वेळा एकटाच राहतो आणि कुटुंबीयांशीही फारसा संवाद साधत नाही. त्याच्या वैद्यकीय नोंदींबाबतची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर पुढील आवश्यक कारवाई सुरू केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय झालं?
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी टोपी घालून शर्टच्या बाह्या वर करत घराबाहेर येताना दिसतो. रस्त्यावर मुले बॅडमिंटन खेळण्यात मग्न असताना अचानक तो मागून धावत येतो आणि हातात बॅडमिंटन रॅकेट धरलेल्या चिमुकल्याच्या पाठीवर जोरात लाथ मारतो. त्यानंतर काहीही न बोलता तो निघूनही जातो.
घटनेनंतर इतर मुलांनी धावत जाऊन पालकांना माहिती दिली. ही घटना समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.