

बंगळुरू : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे एका कोरियन महिलेचा (वय-३२) विमानतळावरील कर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ‘पॅट-डाऊन तपासणी’च्या (मेटल डिटेक्टर वाजल्यावर किंवा संशय असल्यास सुरक्षा कर्मचारी हातांनी हलक्या पद्धतीने कपड्यांच्या वरून शरीर तपासतो किंवा तपासते) नावाखाली अश्लील वर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी महिलेने तक्रार दाखल करताच विमानतळावरील कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
‘बीप’ आवाज आल्याची बतावणी
महिलेच्या तक्रारीनुसार, सोमवारी (दि. १९) ती कोरियाला जाण्यासाठी विमानतळावर आली होती. इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करून टर्मिनलकडे जात असताना मोहम्मद अफ्फान (वय २५) नावाचा पुरुष कर्मचारी तिच्याजवळ आला. त्याने तिचे विमानतिकीट तपासले आणि चेक-इन सामानात अडचण असल्याचे सांगत मशीनमध्ये ‘बीप’ आवाज आल्याचा दावा केला.
तपासणीच्या नावाखाली अश्लील चाळे
नियमित तपासणी काउंटरवर परत गेल्यास वेळ जाईल आणि फ्लाइट चुकू शकते, असे सांगून स्वतंत्रपणे तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्याने तिला पटवले आणि तिला पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळ घेऊन गेला. तेथे त्याने तिच्या विरोधाला न जुमानता अयोग्य स्पर्श केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रतिकार करताच, त्याने तिला मिठी मारून “थँक यू” असे म्हणत तेथून निघून गेल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
आरोपीचे तात्काळ निलंबन
घटनेनंतर महिलेने तात्काळ विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून अफानला अटक केली आहे. आरोपी अफान हा एअर इंडिया SATS या कंपनीत कार्यरत होता. ही कंपनी विमानतळांवर ग्राउंड आणि कार्गो सेवा पुरवते. घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, “केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेली ही घटना अजिबात माफ न करण्याजोगी आहे. संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे पीडितेला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, पीडितेला आवश्यक ती सर्व मदत आम्ही केली आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक केली जात आहे. तपासात आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत,” असेही कंपनीने स्पष्ट केले.