लखनऊ : भारतीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते बुधवारी अयोध्या ते बंगळुरू आणि कोलकाता मार्गावर एअर इंडिया एक्स्प्रेस विमान सेवेचा प्रारंभ झाला. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहिला बोर्डिंग पास देण्यात आला. उद्घाटनप्रसंगी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात उत्तर प्रदेशने केलेल्या प्रगतीची स्तुती केली आणि त्यांचे नेतृत्व अधोरेखित केले. त्यानंतर योगी यांनी नव्या विमानतळासह राज्यात एकूण चार आंतरराष्ट्रीय विमानतळ आल्याचे सांगितले.
याप्रसंगी सिंधिया म्हणाले, उत्तर प्रदेशचा विकास आता नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत आहे. आपण उत्तर प्रदेशची लोकसंख्या पाहिली तर अमेरिकेच्या सत्तर टक्के लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. तसेच युरोपमधील निम्मी लोकसंख्या उत्तर प्रदेशात आहे. नोव्हेंबर महिन्यात आपण दिवाळी साजरी केली. पण, दुसरी दिवाळी ३ डिसेंबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर साजरी करण्यात आली. आता येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण जगभरात दिवाळी साजरी होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. ते म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत उत्तर प्रदेशात केवळ नवे विमानतळच उभे राहिले नाहीत तर ४ आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील उभे राहिले आहेत. यामुळे हवाई वाहतुकीने जोडलेले उत्तर प्रदेश एक महत्त्वाचे राज्य झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ३० डिसेंबर रोजी अनावरण करण्यात आले आहे. लवकरच या विमानतळावरून उड्डाणांची संख्या वाढवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी एकाच दिवशी अयोध्येतील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचेही अनावरण केले. अयोध्येतील वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यासाठी सरकारने १४५० कोटी रुपये खर्च केला आहे. विमानतळाच्या इमारतीचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर आहे. वार्षिक १० लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता या विमानतळात आहे. विमानतळाचा दर्शनी भाग अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या आर्किटेक्चरनुसारच उभारण्यात आला आहे. तसेच विमानतळाच्या आतील भागात श्रीरामाच्या जीवनावर आधारित स्थानिक कला, पेंटिंग आणि म्युरल्स यांनी सजवण्यात आला आहे.