बेंगळुरात सिग्नलवर नृशंस कृत्य; ‘लिव-इन’ जोडीदाराला जिवंत जाळले

बेंगळुरूमध्ये लिव-इन पार्टनरची जिवंत जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आधी कारमध्ये प्रवास करणाऱ्या आपल्या लिव-इन जोडीदाराचा पाठलाग केला. त्यानंतर सिग्नलवर गाडी थांबवून पेट्रोल शिंपडून त्याला जाळले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

बेंगळुरू : बेंगळुरूमध्ये लिव-इन पार्टनरची जिवंत जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आधी कारमध्ये प्रवास करणाऱ्या आपल्या लिव-इन जोडीदाराचा पाठलाग केला. त्यानंतर सिग्नलवर गाडी थांबवून पेट्रोल शिंपडून त्याला जाळले.

या कारमध्ये एकूण तीन जण बसले होते. महिला कारमधून बाहेर पडून पळाली असता आरोपीने तिचा पाठलाग केला. तिच्यावर पुन्हा पेट्रोल टाकून लायटरने आग लावली. महिला सुमारे ६० टक्के भाजली होती. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव विठ्ठल असून तो ५० वर्षांचा आहे.तो कॅब चालक असून दारू पिण्याची सवय होती. मृत महिलेचे नाव वनजाक्षी असून तिचे वय ३५ वर्षे होते. सुमारे चार वर्षांपूर्वी दोघे लिव-इन रिलेशनशिपमध्ये आले होते. मात्र, विठ्ठलच्या दारूच्या व्यसनामुळे आणि सततच्या छळामुळे वनजाक्षी कंटाळली होती. विठ्ठलचे यापूर्वी तीनवेळा विवाह झाले होते. तर वनजाक्षीनेही दोनदा विवाह केले होते. काही दिवसांपूर्वी वनजाक्षीने विठ्ठलपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान तिची मरिअप्पा नावाच्या व्यक्तीशीही मैत्री झाली होती. घटनेच्या दिवशी वनजाक्षी ही मरिअप्पा आणि ड्रायव्हरसोबत मंदिरातून कारने परतत होती. विठ्ठल तिच्या कारचा पाठलाग करत होता. ट्रॅफिक सिग्नलवर विठ्ठलने गाडी थांबवली आणि वनजाक्षी, मरिअप्पा व ड्रायव्हरवर पेट्रोल शिंपडले.

वनजाक्षी पळत असताना ती जमिनीवर कोसळली. त्याचवेळी विठ्ठलने तिच्यावर पुन्हा पेट्रोल टाकून लायटरने आग लावली. घटनास्थळातून मरिअप्पा आणि ड्रायव्हर पळून गेले. दरम्यान, तेथे जाणाऱ्या एका व्यक्तीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्याने स्थानिकांच्या मदतीने वनजाक्षीला खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी लोकांची गर्दी होत असल्याचे पाहून विठ्ठल पळून गेला.

logo
marathi.freepressjournal.in