बंगळुरू कॅफे स्फोटप्रकरणी सूत्रधारासह दोघे जेरबंद; भाजप, तृणमूलमध्ये आरोप- प्रत्यारोप

बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये घडविण्यात आलेल्या स्फोटप्रकरणी ‘एनआयए’ने शुक्रवारी दोन आरोपींना अटक केली...
बंगळुरू कॅफे स्फोटप्रकरणी सूत्रधारासह दोघे जेरबंद; भाजप, तृणमूलमध्ये आरोप- प्रत्यारोप
Published on

नवी दिल्ली : बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेमध्ये घडविण्यात आलेल्या स्फोटप्रकरणी ‘एनआयए’ने शुक्रवारी दोन आरोपींना अटक केली असून त्यामध्ये या स्फोटाच्या सूत्रधाराचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या आरोपींची नावे मुसावीर हुसेन शाझीब आणि अब्दुल मथीन अहमद ताहा अशी आहेत. ते कोलकाताजवळ एका ठिकाणी दडून बसल्याची खबर मिळाल्यानंतर ‘एनआयए’च्या पथकाने त्यांना अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शाझीब याने कॅफेमध्ये जाऊन प्रत्यक्ष बॉम्ब ठेवला होता, तर ताहा याने स्फोटाची योजना आखून तो घडवून आणला. शुक्रवारी सकाळी ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांनी कोलकाताजवळ या आरोपींचा ठावठिकाणा शोधून काढला आणि त्यांना अटक केली. हे दोघे तेथे वेगळ्या नावाने वास्तव्य करीत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एनआयए, केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमधील यंत्रणा यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने ही मोहीम पार पाडण्यात आली. या आरोपींच्या अटकेसाठी एनआयएने गेल्या महिन्यात १० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते. कॅफेमध्ये १ मार्च रोजी स्फोट घडविण्यात आला होता.

राज्य पोलिसांच्या तत्परतेमुळेच आरोपींना अटक - ममता

पश्चिम बंगाल हे दहशतवाद्यांना आश्रय देणारे नंदनवन बनले आहे, या भाजपने केलेल्या आरोपावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. राज्य पोलिसांनी त्वरेने केलेल्या कारवाईमुळेच बंगळुरू स्फोटातील आरोपींना अटक करता आली, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

भाजप, तृणमूलमध्ये आरोप- प्रत्यारोप

बंगळुरू कॅफे स्फोटप्रकरणी दोन आरोपींना कोलकाताजवळून अटक करण्यात आल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल सरकारने राज्याला दहशतवाद्यांना आश्रय देणारे नंदनवन बनविले आहे, असा आरोप भाजपने केला आहे. तर भाजपने केलेल्या आरोपाला पश्चिम बंगालमधील सत्तारूढ तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य पोलिसांच्या मदतीने एनआयएने या दोन आरोपींना अटक केली असल्याचे राज्य पोलिसांनी म्हटले आहे.

भाजपचे सुवेन्दू अधिकारी यांच्या बालेकिल्ल्यात आरोपींना अटक

भाजपकडून 'एक्स'वर पोस्ट टाकण्यात आल्यानंतर काही क्षणातच तृणमूलचे नेते कुणाल घोष यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. या दोन आरोपींना पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आल्याचे घोष यांनी स्पष्ट केले. या आरोपींना ज्या ठिकाणाहून अटक करण्यात आले ते ठिकाण कंथी अथवा कोंटाई म्हणून ओळखले जाते आणि हे ठिकाण भाजपचे नेते सुवेन्दू अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. त्यामुळे यामागे अधिकारी कुटुंबीयांचा काही संबंध आहे का, याचा राज्य यंत्रणांनी तपास करावा, असेही घोष यांनी म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in