बंगळुरू बॉम्बस्फोटाने हादरले; रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट; CCTV Video आला समोर; तपास सुरू

रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट झाला त्यावेळचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. अचानक स्फोट होताच कर्मचाऱ्यांसह ग्राहक आणि उपस्थित सर्वच घाबरून मिळेल त्या दिशेने पळत सुटताना व्हिडिओत दिसत आहे.
बंगळुरू बॉम्बस्फोटाने हादरले; रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट; CCTV Video आला समोर; तपास सुरू

बंगळुरू : व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या आयईडी स्फोटात दहा जण जखमी झाले आहेत. या घटनेत सुरुवातीला एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाल्याचे प्राथमिक स्तरावर सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी सर्वकष चौकशी केल्यानंतर सदर स्फोट हा एलपीजी गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या स्फोटासंबंधात राष्ट्रीय तपास संस्था आणि ‘आयबी’लाही माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेच्या स्थानिक कार्यालयातील एक पथक येथे दाखल झाले. संभाव्य स्फोट आयईडीने केला गेला असावा व भोजनालयातील बॅगमध्ये हा स्फोट झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

यासंबंधात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, व्हाईटफिल्डमधील लोकप्रिय रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोटाचे कारण आणि त्याचे स्वरूप शोधण्यासाठी तपास सुरू आहे आणि तो ‘इम्प्रोव्हायझ्ड एक्सप्लोसिव्ह’ डिव्हाइसमुळे झाला असावा, असे दिसते. या घटनेचे राजकारण करू नये आणि सर्वांनी सहकार्य करावे, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

राज्याचे पोलीस प्रमुख आलोक मोहन यांनी या स्फोटाचे वर्णन ‘बॉम्बस्फोट’ असे केले. दुपारी १ वाजता हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्यात नऊ जण जखमी झाले, पण कोणीही गंभीर जखमी नाही. याबाबत आम्ही तपास करत आहोत. फॉरेन्सिक पथके आली आहेत आणि तपासणी करत आहेत. शहर पोलीस आयुक्त आणि इतर अधिकारी येथे आहेत, असे आलोक मोहन यांनी सांगितले. रामेश्वरम कॅफेच्या सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक दिव्या राघवेंद्र राव यांनी एका कन्नड वृत्तवाहिनीला सांगितले की, ग्राहक ज्या ठिकाणी हात धुतात तेथे हा स्फोट झाला. तेथे एक स्टँडही ठेवण्यात आला असून, तेथे कचरा गोळा केला जातो. बाहेरून आलेल्या कोणीतरी ठेवलेल्या पिशवीतून हा स्फोट झाला, असा दावा त्यांनी केला. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्फोट होताना दिसत आहे, ज्यामुळे धुराचे लोट आणि घाबरलेले ग्राहक आणि इतरांनी तेथून पळ काढल्याचे दिसत आहे.

विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र येडियुरप्पा यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले की, रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. घटनेतील सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना मी करतो. राज्य सरकारने सविस्तर चौकशीचे आदेश द्यावेत आणि गुन्हेगारांना पकडण्यात कोणतीही कसर सोडू नये, अशी मागणी त्यांनी केली.

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेला स्फोट हा कमी तीव्रतेचा स्फोट होता आणि त्यासाठी टाइमर निश्चित करण्यात आला होता. शिवकुमार यांच्यासह गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली आणि नंतर रुग्णालयात दाखल झालेल्या जखमींचीही तपासणी केली.

दुपारी एक वाजता हा स्फोट झाला. रामेश्वरम कॅफे येथे घडली. सुमारे २८-३० वर्षांचा एक तरुण कॅफेमध्ये आला, त्याने काउंटरवर रवा इडली खरेदी केली, पिशवी एका झाडाजवळ (कॅफेला लागून) ठेवली आणि निघून गेला. एक तासानंतर स्फोट झाला, अशी माहितीही शिवकुमार यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in