रामेश्वरम कॅफे स्फोट : आता NIA करणार तपास

रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटामागे काय हेतू असू शकतो, त्या संबंधात विविधांगांनी तपास केला जात आहे.
रामेश्वरम कॅफे स्फोट : आता NIA करणार तपास

बंगळुरू : रामेश्वरम कॅफेमध्ये शुक्रवारी झालेल्या स्फोटामागे काय हेतू असू शकतो, त्या संबंधात विविधांगांनी तपास केला जात आहे. आता या स्पोटाचा तपास गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. गरज भासल्यास एनआयएकडे तपास देण्यात येईल, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एक दिवसापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर सोमवारी एनआयएने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.

१ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पूर्व बंगळुरूमधील ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये हा स्फोट झाला. यात ९ जण जखमी झाले. टोपी, मास्क आणि चष्मा घातलेला एक माणूस या प्रकरणात मुख्य संशयित आहे आणि तो अद्याप सापडलेला नाही. हा स्फोट टायमर असलेल्या आयईडी उपकरणामुळे झाल्याची शक्यता आतापर्यंतच्या पोलिस तपासातून वर्तवली जात आहे.

दरम्यान, "आठ पथके या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कार्यरत आहेत. राष्ट्रीय तपास संस्था, राष्ट्रीय सुरक्षा गट हेदेखील या पथकांसोबत आहेत. इंटेलिजन्स ब्युरोही मदत करत आहेत. येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमध्ये दहशत माजवायची होती की नाही हे तपासले जात आहे. निवडणुका जवळ येत आहेत. जर त्यामागे कोणतीही संघटना असेल, किंवा बंगळुरूला असुरक्षित भासविण्यासाठी लोकांमध्ये दहशत माजवण्याचे काही इतर हेतू असतील तर त्या दृष्टीनेही विचार केला जात आहे. स्थिर सरकारच्या पार्श्वभूमीवर बरेच गुंतवणूकदार येथे येत असल्याने, हे गुंतवणूकदारांना बंगळुरूला येण्यापासून रोखण्यासाठी किंवा इतर काही अज्ञात कारणांमुळे केले गेले असावे. व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी ईर्षेतून हे केले असावे. रामेश्वरम कॅफेमध्ये ११ युनिट्स आहेत आणि मालक त्यांचे १२ वे युनिट स्थापित करण्याचा विचार करत होते, ज्यासाठी आगाऊ ठेव देखील भरली गेली होती. हे प्रकरण कितीही कठीण असले तरी आमचा विभाग त्याचा शोध घेईल", असे राज्याचे गृहमंत्री परमेश्वरा यांनी यापूर्वी सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in