Bengaluru Road Rage : बंगळुरू हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; IAF अधिकाऱ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, नवीन Video समोर

पत्नीसह विमानतळावर जात असताना एका दुचाकीस्वाराने कार अडवून शिवीगाळ केली आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भारतीय हवाई दलाचे अधिकारी, विंग कमांडर शिलादित्य बोस यांनी केला होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करुन त्यांनी हा दावा केल्यानंतर खळबळ उडाली होती.
Bengaluru Road Rage : बंगळुरू हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; IAF अधिकाऱ्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, नवीन Video समोर
Published on

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये पत्नीसह विमानतळावर जात असताना एका दुचाकीस्वाराने कार अडवून शिवीगाळ केली आणि रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप भारतीय हवाई दलाचे अधिकारी, विंग कमांडर शिलादित्य बोस यांनी केला होता. सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करुन त्यांनी हा दावा केल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात वेगळी बाजू समोर आली असून बोस यांच्याविरोधातच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळुरू पोलिसांनी विकासच्या (आरोपी, दुचाकीस्वार) तक्रारीनंतर बोस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय.

बोस यांच्यावर आरोप काय?

  • विकासने बोस यांच्यावर आणि त्यांच्या पत्नीवर स्वतःवर हल्ला केल्याचा आणि कन्नड भाषेत बोलल्यामुळे मुद्दाम लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे.

  • बोस यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांनुसार, त्यांनीच प्रथम बाइकस्वारावर हल्ला केला होता, तर दुचाकीस्वाराने केवळ स्वसंरक्षणासाठी प्रतिकार केला. त्यानंतर, बोस यांनी त्याला मारहाण केली.

  • कन्नड न बोलल्यामुळे बाइकस्वाराने त्यांच्यावर हल्ला केला, अशी खोटी बतावणी बोस यांनी नंतर केली. अशा प्रकारचे खोटे दावे भाषिक किंवा जातीय तणाव निर्माण करू शकतात.

  • आरोपांनुसार, संबंधित हवाई दल अधिकाऱ्याने स्वतः DRDO (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शी संबंधित असल्याचा खोटा दावा केला.

  • त्यांनी हल्ल्याविषयी खोटा दावा करून सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड केला.

  • त्यानंतर, बोस हे कोलकात्याला पळून गेले, असाही आरोप आहे.

  • या घटनेबाबत सत्य लपवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी बोस यांनी लष्करी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वापर करून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला, असेही आरोपांमध्ये नमूद आहे.

पोलिसांनी काय सांगितले?

“सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अधिकारी बोस त्यांच्या DRDO क्वार्टर्समधून केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. त्यांची पत्नी गाडी चालवत होती आणि ते तिच्या शेजारी बसले होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये आणि एका बाइकस्वारामध्ये वाद झाला आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ला केला. ही रोड-रेजची घटना आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे, ” पोलीस उपायुक्त (पूर्व) देवराज डी यांनी पीटीआयला सांगितले.

सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंवरून हा संघर्ष टाळता आला असता, असेही त्यांनी सांगितले. "जेव्हा ते पोलिस स्टेशनमध्ये आले, तेव्हा स्टेशन हाऊस ऑफिसरने (SHO) त्या अधिकाऱ्याला रक्तस्राव होत असल्यामुळे प्रथमोपचार घेण्याचा सल्ला दिला आणि नंतर FIR नोंदवण्यास सांगितले. पण त्यांना उशीर होत असल्यामुळे ते थेट विमानतळाकडे रवाना झाले. ते सोशल मीडियावर लाईव्ह गेल्यानंतर आम्ही मधुमिता यांचा तपशील शोधून काढला आणि DRDO क्वार्टर्सशी संपर्क साधला. त्या पोलिस स्टेशनमध्ये आल्या आणि तक्रार दाखल केली. आम्ही गंभीर दुखापतीच्या कलमाखाली FIR नोंदवला आहे," असे डीसीपी म्हणाले.

आरोपी विकासने चौकशीदरम्यान सांगितल्यानुसार, तो दुचाकीवरुन जात असताना कारमधील महिलेने काही टिप्पणी केल्यामुळे त्याने पुढे गाडी थांबवली आणि अधिकाऱ्याला मॅडम काय बोलत आहेत असे विचारले, त्यानंतर वाद झाला, असेही देवराज डी यांनी सांगितले. "आमच्याकडे पुरेसे व्हिडिओ पुरावे आहेत आणि तपास सुरू आहे," असेही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेचे काही व्हिडिओ आता समोर येत असून यामध्ये बोस यांनीच मारहाणीला सुरूवात केल्याचं दिसतंय. ते आरोपी विकासला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. त्यांची पत्नीही रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

काय होता बोस यांचा दावा?

आपली पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता हिच्यासह कारमधून विमानतळावर जात असताना अचानक मागून आलेल्या एक दुचाकीने आमची गाडी अडवली. त्या व्यक्तीने कन्नडमध्ये मला शिव्या द्यायला सुरुवात केली. त्याने माझ्या गाडीवरचा 'डीआरडीओ'चा स्टिकर पाहिला आणि 'तुम्ही डीआरडीओ वाले...' म्हणत माझ्या पत्नीला शिव्या दिल्या. ते अजिबात सहन न झाल्याने मी गाडीतून उतरलो आणि त्याच क्षणी त्या बाईकवाल्याने गाडीची किल्ली माझ्या कपाळावर मारली आणि रक्ताची धार सुरू झाली. 'आम्ही तुमचं रक्षण करतो आणि तुम्ही अशा पद्धतीने आमच्यावरच हल्ला करता? सैन्य, हवाई दल आणि नौदलातील एखाद्या व्यक्तीशी असं वागता का?' असं मी ओरडत असताना अजून लोक जमा झाले आणि त्यांनी आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली. एका व्यक्तीने एक दगड उचलला आणि माझ्या गाडीवर मारण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्या डोक्याला लागला. सुदैवाने, माझी पत्नी तिथे होती आणि तिने मला तिथून बाहेर काढलं. आम्ही पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, पण तिथून अजून काहीच प्रतिसाद नाही. कर्नाटकाची ही अवस्था झाली आहे...हीच खरी वस्तुस्थिती आहे. मला स्वतःला यावर विश्वास बसत नाही. देवा आमची मदत कर. देवा मला प्रतिकार (बदला) न करण्याचं बळ देवो. उद्या जर कायदा आणि सुव्यवस्था आमच्या मदतीला आली नाही, तर मी प्रतिकार करेन," असा दावा बोस यांनी गाडीत बसून व्हिडिओ रेकॉर्ड करताना केला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

logo
marathi.freepressjournal.in