"...तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल", डीके शिवकुमार यांच्या भावाचे वादग्रस्त वक्तव्य

केंद्राने आम्हाला पैसै देणे बाकी आहेत, ते जरी आम्हाला दिले तरी ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत...
"...तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल",  डीके शिवकुमार यांच्या भावाचे वादग्रस्त वक्तव्य
Published on

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे भाऊ काँग्रेसचे खासदार डीके सुरेश यांनी अंतरिम अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारताचा निधी उत्तर भारतासाठी वळविला जात असल्याचा गंभीर आरोप करत दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करावी लागले, असे वक्तव्य सुरेश यांनी केले आहे. सुरेश यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.

विकासाच्या निधीतील आमचा वाटा उत्तर भारताकडे वळवला जात असून सर्वच बाबतीत आमच्याशी चुकीचे वागले जात आहे, असा आरोप सुरेश यांनी केला. तसेच, आपण जर याचा विरोध केला नाही तर दक्षिण भारताला वेगळा देश बनविण्याची मागणी करावी लागेल. हिंदी राज्ये ती करण्यासाठी आम्हाला भाग पाडत आहेत, असे सुरेश म्हणाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

"केंद्राने आम्हाला पैसै देणे बाकी आहेत, ते जरी आम्हाला दिले तरी ते पुरेसे होईल. जीएसटी म्हणून जमा केलेले कर, सीमाशुल्क आणि प्रत्यक्ष कर आमच्यापर्यंत पोहोचायला हवेत. दक्षिण भारतासोबत खूप चुकीचे घडतेय हे आम्ही पाहत आहोत", असेही ते म्हणाले.

सुरेश यांनी यांच्यावक्तव्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सुरेश यांच्यासह डी के शिवकुमार आणि काँग्रेस पक्षावर टीका केली. "काँग्रेस हा एकेकाळी सरदार पटेल सारख्या नेत्यांचा पक्ष होता, ज्यांनी भारताला एका वैविध्यपूर्ण पण एकसंध राष्ट्रात समाकलित करण्याचे काम केले. आज राहुल काँग्रेसचे प्रतिनिधित्व डीके सुरेश सारखे लोक करतात - जामिनावर असलेला भाऊ आणि भ्रष्टाचाराचे आरोपी काँग्रेस उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार", असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, उत्तर-दक्षिण संघर्ष आणि तुष्टीकरणाचे राजकारण करून लोकांमध्ये फूट पाडणे हा त्यांचा अजेंडा आहे, असेही ते म्हणाले. त्यांनी त्यांच्या 'एक्स'हँडलवर याबाबतची पोस्ट केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in