
बंगळुरू : तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर निघालेल्या विजयी रॅलीत बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. या चेंगराचेंगरीसाठी कर्नाटक सरकारने ‘आरसीबी’ आणि ‘बीसीसीआय’वर खापर फोडले आहे.
या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती आणि आयोजकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अख्ख्या जगाला कार्यक्रमासाठी बोलावले, असे सरकारने उच्च न्यायालयात सांगितले.
राज्य सरकारची बाजू मांडताना ॲॅडव्होकेट जनरल शशी किरण शेट्टी यांनी हायकोर्टाला सांगितले की, “आरसीबीने त्यांच्या भागीदारांविरुद्ध अनेक आरोप केले आहेत. राज्य सरकारने या घटनेसाठी ‘बीसीसीआय’ जबाबदार असल्याचा आरोप केला. या विजयोत्सव मिरवणुकीसाठी सुरक्षा, प्रवेशद्वार आणि तिकीट व्यवस्थापनाबाबत आरसीबी आणि बीसीसीआय यांच्यात करार झाला होता. असे वाटत होते जसे की त्यांनी संपूर्ण जगाला आमंत्रित केले आहे.”