
बंगळुरू : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद संपादन केल्यावर बुधवारी बंगळुरूतील एन. चिन्नास्वामी स्टेडियमवर निघालेल्या विजयी रॅलीदरम्यान चेंगराचेंगरी झाली अन् ११ जणांचा मृत्यू ओढवला. या चेंगराचेंगरीप्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी डीएनए आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरू चेंगराचेंगरीप्रकरणी कर्नाटक सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात स्थितीदर्शक अहवाल सादर केला. आता या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल, तसेच विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात येईल, असे कर्नाटक सरकारने हायकोर्टात स्पष्ट केले. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश व्ही. कामेश्वर राव आणि न्यायमूर्ती सीएम जोशी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला अपघाताचा स्थिती अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. आता पुढील सुनावणी १० जून रोजी होईल. “आरसीबीच्या खेळाडूंना सन्मानित करण्याचा निर्णय कोणी घेतला? हे राज्य सरकारने स्पष्ट करावे. देशासाठी न खेळणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्याची काय गरज होती?,” असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने गुरुवारी हायकोर्टात केला.
‘आरसीबी’कडून मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये
तब्बल १८ वर्षांनंतर आयपीएलचे विजेतेपद पटकावल्यानंतर विजयोत्सव करताना झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाल्यावर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायजीने मोठा निर्णय घेतला आहे. आरसीबी फ्रँचायजीने ११ मृतांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी आरसीबीकडून ‘आरसीबी केअर्स’ नावाचा मदतनिधीदेखील तयार केला जात आहे.
‘बीसीसीआय’ने हात झटकले
बंगळुरूतील आरसीबीच्या विजयोत्सवात चेंगराचेंगरी झाल्याच्या घटनेपासून बीसीसीआय आणि आयपीएल प्रशासनाने हात झटकले आहेत. आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले की, “चेंगराचेंगरीची घटना कळताच आम्ही ताबडतोब आयोजकांना कार्यक्रम लवकर संपवण्याची विनंती केली. या घटनेला ‘बीसीसीआय’ जबाबदार नाही. ही खरोखरच अतिशय दुःखद घटना असून आम्ही मनापासून शोक व्यक्त करतो. ‘बीसीसीआय’साठी आयपीएल अंतिम सामन्यानंतरच संपुष्टात आली. आम्हाला अशा कोणत्याही घटनेची कोणतीही माहिती नव्हती, मग आम्हाला त्यासाठी कसे जबाबदार धरता येईल?”