आई की कसाई! CEO ने गोव्यात केली पोटच्या मुलाची हत्या, मृतदेह बॅगेत कोंबून बेंगळुरूला जाताना पोलिसांनी पकडले

आई की कसाई! CEO ने गोव्यात केली पोटच्या मुलाची हत्या, मृतदेह बॅगेत कोंबून बेंगळुरूला जाताना पोलिसांनी पकडले

गोव्यामध्ये मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये कोंबून कॅबमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून सोमवारी संध्याकाळी अटक
Published on

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका एआय स्टार्टअपची सीईओ असलेल्या सुचना सेठ (३९) हिने स्वतःच्याच चार वर्षांच्या मुलाची हत्या केली. गोव्यामध्ये मुलाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह बॅगमध्ये कोंबून कॅबमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातून सोमवारी संध्याकाळी अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

हत्येमागचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरी, प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी महिलेने तिच्या 'विभक्त पतीसोबतचे ताणलेले संबंध’ हे एक कारण म्हणून सांगितले. सुचनाने शनिवारी उत्तर गोव्यातील कँडोलिम येथील एका लक्झरी अपार्टमेंटमध्ये आपल्या मुलासह चेक-इन केले होते आणि सोमवारी सकाळी एकटीनेच चेक आउट केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

असा झाला खुलासा -

हाऊस-कीपिंग कर्मचार्‍यांपैकी एक कर्मचारी सोमवारी अपार्टमेंट साफ करण्यासाठी गेला असता त्याला काही रक्ताचे डाग दिसले. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने गोवा पोलिसांशी संपर्क साधला आणि कळंगुट पोलिस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर आरोपी हातात बॅग घेऊन तिच्या मुलाशिवाय हॉटेलमधून जाताना दिसली.

विमानाऐवजी केला टॅक्सीचा हट्ट

तपासादरम्यान, हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितले की, महिलेने रिसेप्शनिस्टला तिला बेंगळुरूला जाण्यासाठी कॅबची व्यवस्था करण्यास सांगितले होते. हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी तिला कॅब महाग पडेल, त्याऐवजी विमानाने जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु आरोपीने कॅबनेच जाण्याचा आग्रह धरला होता,” असे पोलिसांनी सांगितले.

गोवा पोलिसांची कामगिरी -

गोवा पोलिसांनी कॅब चालकाशी संपर्क साधला आणि सुचनाशी फोनवर बोलून तिच्या मुलाची चौकशी केली. तेव्हा मुलाला गोव्यातील फातोर्डा येथील मित्राकडे सोडल्याचे तिने सांगितले. तिची उत्तरे संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाला पुन्हा फोन केला, यावेळी त्याच्याशी कोकणीमध्ये बोलले आणि प्रवाशाला काहीही न सांगता जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गाडी घेऊन जाण्यास सांगितले. तोपर्यंत टॅक्सी चित्रदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली होती. चित्रदुर्गातील पोलिस स्टेशनमध्ये आल्यावर कर्नाटक पोलिसांना मुलाचा मृतदेह तिच्या बॅगमध्ये सापडला आणि तिला ताब्यात घेतले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

कोण आहे सुचना सेठ? -

सुचना सेठ, एक डेटा सायंटिस्ट असून ‘द माइंडफुल एआय लॅब’ या टेक कन्सल्टन्सीची संस्थापक आणि सीईओ आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, ती एक आर्टिफिशियल इंटेलिजेंस एथिक्स एक्सपर्ट आहे. डेटा सायन्स आणि स्टार्टअप इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा 12 वर्षांचा अनुभव आहे. ती AI एथिक्स लिस्टमधील 100 ब्रिलियंट महिलांमध्ये होती आणि बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथील हार्वर्ड विद्यापीठातील बर्कमन क्लेन सेंटरमध्ये फेलो देखील होती.

logo
marathi.freepressjournal.in