
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशातील १० प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने, संलग्न शेतकरी व कामगार संघटनांना सोबत घेऊन बुधवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. ‘व्यवसाय सुलभते’च्या नावाखाली राबवल्या जाणाऱ्या आर्थिक व कामगार सुधारणांमुळे कामगारांचे हक्क डावलले जात असून, सामूहिक सौदाशक्ती कमकुवत केली जात आहे, असा थेट आरोप या संघटनांनी केला आहे.
हा बंद सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या निषेधार्थ पुकारण्यात आला आहे. परिणामी बँकिंग, टपाल, कोळसा खाणकाम, कारखाने आणि राज्य परिवहन सेवा प्रभावित होतील, अशी शक्यता आहे.
सामूहिक अधिकारांवर गदा
कामगार हक्कांचे नियमन हे केंद्र आणि राज्य स्तरावरील २० हून अधिक विविध कायद्यांद्वारे केले जात होते, ज्यात कामगारांचे हक्क आणि कर्तव्ये यांच्या विभिन्न पैलूंचा समावेश होता. गेल्या पाच वर्षांपासून केंद्र सरकार या सर्व कायद्यांचे एकत्रीकरण करून त्यांच्या संहिता तयार करत आहे आणि या संहिता चालू वर्षात लागू होण्याची शक्यता आहे. कामगार संघटनांनी यापूर्वीही या संहितांना तीव्र विरोध दर्शवला आहे. या संहिता उद्योगपूरक असून, त्या कामगारांची एकजूट मोडीत काढणाऱ्या आणि आपल्या हक्कांसाठी एकत्रितपणे आंदोलन करण्याच्या सामूहिक अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत, असे कामगार संघटनांचे म्हणणे आहे.
मुंबईत काय बंद-काय सुरू? बँका आणि विमा सेवा
भारत बंदमुळे मुंबईतील बँकिंग कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक बँक कर्मचारी संघटनांनी संपाला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे रोख व्यवहार, चेक क्लिअरन्स यांसारख्या सेवा उपलब्ध नसतील किंवा सेवांमध्ये विलंब होऊ शकतो. विमा कंपन्यांमधील कर्मचारीदेखील संपात सामील होऊ शकतात.
वीज पुरवठा आणि सार्वजनिक सेवा
संपूर्ण भारतातील २७ लाखांहून अधिक वीज कर्मचारी संपात सामील होणार आहेत. त्यामुळे वीज पूर्ण खंडित होण्याची शक्यता नसली तरीही, विजेशी संबंधित समस्या सोडवण्यात विलंब किंवा किरकोळ सेवा खंडित होण्याची शक्यता आहे.
लोकल ट्रेन आणि बेस्ट बस
मुंबईतील लोकल ट्रेन आणि बेस्ट बस सेवा नेहमीप्रमाणे सुरू असतील असे म्हटले जात आहे. पण वाहतूक संघटनांनी ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला, तर परिस्थिती बदलू शकते. सध्यातरी वाहतूक बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
शाळा आणि महाविद्यालये
‘भारत बंद’मुळे महाराष्ट्र सरकारने शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याची कोणतीही सूचना दिलेली नाही. मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये सुरू राहणार आहेत. पण वाहतुकीच्या परिस्थितीवरुन विद्यार्थ्यांची उपस्थिती ठरु शकेल.
खासगी कार्यालये आणि बाजारपेठा
बीकेसी, लोअर परळ आणि अंधेरी येथील खाजगी क्षेत्रातील कार्यालये सुरू राहणार आहेत. खबरदारी म्हणून काही कंपन्यांनी ‘वर्क फॉर्म होम’चा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. संपादरम्यान दुकाने, बाजारपेठा आणि रेस्टॉरंट्स नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे म्हटले जात आहे.
२५ कोटी कर्मचारी सहभागी
ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या (आयटक) अमरजीत कौर यांनी सांगितले की, या संपात बँकिंग, विमा, टपाल सेवेसह विविध क्षेत्रांतील २५ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांसह देशभरातील शेतकरी आणि ग्रामीण कामगारसुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे. अद्याप, देशव्यापी रेल्वे संपाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. तथापि, आंदोलनांमुळे रेल्वे सेवांमध्ये विलंब किंवा व्यत्यय येण्याची शक्यता आहे.