
नवी दिल्ली : भारताने स्वदेशी हवामान अंदाज प्रणालीचे सोमवारी अनावरण केले. या प्रणालीमुळे आकाशात ६ किमीपर्यंत स्पष्ट प्रतिमा दिसणार आहे. यामुळे हवामान खात्याला अधिक स्थानिक ठिकाणचे अचूक अंदाज वर्तवण्यास मदत मिळणार आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिरीटॉलॉजीने ‘भारत फॉरकास्टिंग सिस्टीम’ (बीएफएस) यंदाच्या मान्सूनला सुरू केली आहे. यामुळे भारत हा अचूक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे, असे पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
उष्ण कटिबंधीय प्रदेश हा हवामानाच्या दृष्टीने गोंधळलेला प्रदेश असतो. हवामान पद्धतीत होणारा बदल मोठा आहे. अवकाशीय बदल टिपण्यासाठी उच्च प्रतिमा असलेल्या मॉडेल्सची आवश्यकता आहे. यापूर्वी आम्ही चार गावांसाठी एक अंदाज वापरत होतो. आता बीएफएसच्या सहाय्याने आम्ही चार वेगवेगळ्या गावांचे वेगळे भाकीत वर्तवू शकतो, असे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. रविचंद्रन म्हणाले.
पृथ्वी विज्ञान खात्याचे मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले की, बीएफएसमुळे मान्सूनवर लक्ष ठेवणे, विमान वाहतूक, चक्रीवादळावर लक्ष ठेवणे, आपत्कालीन व्यवस्थापन, कृषी, जलमार्ग, संरक्षण, पूर अंदाज आदीसाठी मदत मिळेल. तसेच अनेक मंत्रालयांना त्याचा फायदा होईल. भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची बनली आहे. त्यामुळे या नवीन हवामान अंदाज प्रणालीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होऊन नुकसान टळू शकेल. हे नवीन हवामान अंदाज प्रणाली अनेक संशोधकांनी तयार केली. त्यात आयआयटीएमच्या संकुलात नवीन सुपर कॉम्प्युटर बसवणारे पार्थसारथी मुखोपाध्याय यांचा समावेश आहे. या सुपर कॉम्प्युटरची क्षमता ११.७७ पेटाफ्लॉप आहे, तर साठवणूक क्षमता ३३ पेटाबाइट्स आहे. यापूर्वीचा सुपर कॉम्प्युटर ‘प्रत्युश’ हा १० तासांपर्यंत अंदाज मॉडेल वर्तवत होता, तर नवीन ‘अर्क’ हा सुपर कॉम्प्युटर अवघ्या चार तासांत हे काम करतो, असे मुखोपाध्याय म्हणाले.
रामचंद्रन म्हणाले की, देशातील ४० डॉपलर हवामान रडार हे ‘बीएफएस’ मॉडेलवर आधारित आहेत. ते स्थानिक हवामानाचे अंदाज वर्तवू शकतात. येत्या काळात डॉपलर रडारची संख्या १०० वर नेण्यात येणार आहे. त्यानंतर हवामान कार्यालये दोन तासांचे हवामानाचे अंदाज वर्तवू शकतात.