भारत जोडो न्याय यात्रेत राडा; राहुल गांधींवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेची दखल घेत जमावाला चितावणी दिल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पोलीस महासंचालकाना आदेश दिले आहेत.
भारत जोडो न्याय यात्रेत राडा; राहुल गांधींवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश

गुवाहाटी : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेत मंगळवारी राडा झाला. ही यात्रा गुवाहाटीच्या सीमेवर रोखल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात संघर्ष झाला. कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून यात्रा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यात काही पोलिसांना इजा झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या घटनेची दखल घेत जमावाला चितावणी दिल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पोलीस महासंचालकाना आदेश दिले आहेत. त्यामुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी या घटनेविषयी सांगितले की, गुवाहाटीमध्ये ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र त्यांना विद्यार्थ्यांशी बोलण्यापासून रोखले जात आहे. आम्ही बॅरिकेड्स तोडले, पण कायदा मोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आसामचे मुख्यमंत्री हे देशातील सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. मी जेव्हा जेव्हा राज्यात फिरतो तेव्हा लोक मला तसे सांगतात, असा आरोप करत राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री सरमा यांनी भारत जोडो न्याय यात्रेसाठी अडथळे निर्माण केल्याबद्दल जोरदार टीका केली. सरमा यांच्या या कृतीमुळे आमच्या यात्रेलाच फायदा होणार असून त्यामुळे आम्ही लोकांपर्यंतही पोहोचत आहोत, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यातील प्रचंड बेरोजगारी आहे, प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रचंड महागाई आहे, शेतकरी संघर्ष करत आहेत, युवकांना नोकऱ्या नाहीत आणि हेच मुद्दे आम्ही मांडत आहोत.

दरम्यान राहुल गांधींच्या यात्रेला गुवाहाटी शहरात परवानगी नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यांना शहराच्या बाहेरून जाण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी मनाई आदेश मोडून पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या गोंधळानंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

फुटेज पुरावे म्हणून वापरणार

राहुल गांधी यांच्याविरुद्ध बॅरिकेड्स तोडण्यासाठी जनसमुदायाला चिथावणी दिल्याबद्दल गुन्हा नोंदवावा, असे आदेश पोलीस महासंचालकांना देत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी यांच्या या कृतीला नक्षलवादी डावपेच असे म्हटले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर या संबंधात पोस्ट केली आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. व्ही यांच्या पोस्टला उत्तर देताना ही पोस्ट केली. सरमा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, श्रीनिवासने त्याच्या हँडलवर पोस्ट केलेले फुटेज पुरावा म्हणून वापरले जातील. हा आसामी संस्कृतीचा भाग नाहीत. आमचे शांतताप्रिय राज्य आहे.

logo
marathi.freepressjournal.in