भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच राहुल गांधींसोबत सामील झाल्या प्रियंका, समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आजपासून भारत जोडो न्याय यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून यात्रेला सुरुवात झाली.
भारत जोडो न्याय यात्रेत पहिल्यांदाच राहुल गांधींसोबत सामील झाल्या प्रियंका, समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी
Published on

नवी दिल्ली : खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा आज पुन्हा सुरू झाला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून सुरू झालेल्या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राहुल यांची बहीण आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या पहिल्यांदाच सामील झाल्या. यात्रेदरम्यान खुल्या जीपमधून दोघे बाहेर पडताच लोकांची गर्दी झाली. या यात्रेचे लोकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी समाजवादी पक्षाचे कार्यकर्तेही राहुल गांधींसोबत पक्षाचा झेंडा हातात घेऊन चालताना दिसले.

उत्तर प्रदेशात चंदौली येथे प्रवेश केल्यावरच प्रियंका या यात्रेत सहभागी होणार होत्या, परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि त्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे शनिवारी मुरादाबाद येथून पुन्हा यात्रेला सुरुवात झाल्यावर त्या सामील झाल्या. त्या राहुल गांधींसोबत मुरादाबादहून प्रवास करतील आणि अमरोहा, संभल, बुलंदशहर, अलिगढ, हाथरस, आग्रा या मार्गाने रविवारी फतेहपूर सिक्री येथे यात्रेतील आपल्या सहभागाचा समारोप करतील, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव २५ फेब्रुवारी रोजी आग्रा येथील यात्रेत सहभागी होणार आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी मुरादाबाद येथून यात्रा पुन्हा सुरू झाली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील प्रमुख जिल्ह्यांमधून मार्गक्रमण केल्यानंतर रविवारी राजस्थानमधील धौलपूर येथे समाप्त होईल. काँग्रेसने म्हटले आहे की, २६ फेब्रुवारी ते १ मार्च हा काळ यात्रेसाठी ब्रेक असेल.

logo
marathi.freepressjournal.in